अमेरिका
rj mitte हॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली असून, लोकप्रिय अमेरिकन मालिका ‘ब्रेकिंग बॅड’मधून विशेष ओळख मिळवणारे अभिनेते आरजे मिट्टे यांचे १२ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाच्या ३४व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रतिनिधींनी निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ब्राउन्सव्हिल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मनोरंजनविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यूचे नेमके कारण अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही.
आरजे मिट्टे यांनी निधनाच्या अवघ्या काही दिवस आधी, ७ ऑक्टोबर रोजी, इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. जो व्हुल्पिस यांच्या पॉडकास्टमधील चर्चेचा हा भाग होता. या मुलाखतीत त्यांनी ‘ब्रेकिंग बॅड’ या गाजलेल्या मालिकेच्या कथेविषयी आपले विचार मांडले होते. मालिकेचा शेवट झाला असला, तरी व्हाइट कुटुंबाची गोष्ट पूर्णपणे संपलेली नाही, असे त्यांना वाटत होते. वॉल्टर व्हाइट, स्कायलर आणि त्यांची मुलगी होली यांच्या आयुष्यातील अनेक पैलू अद्याप पडद्यावर उलगडता येऊ शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या मते, मालिकेचा शेवट हा प्रामुख्याने हेझेनबर्ग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वॉल्टर व्हाइटच्या गुन्हेगारी प्रवासाचा शेवट होता; मात्र, संपूर्ण कुटुंबाची कथा तिथेच संपली असे म्हणता येणार नाही. त्यांच्या या विधानामुळे मालिकेच्या चाहत्यांमध्ये नव्या कथानकाच्या शक्यतेबाबत चर्चा सुरू झाली होती.
‘ब्रेकिंग बॅड’मधील वॉल्टर व्हाइट ज्युनियर अर्थात फ्लिन ही भूमिका आरजे मिट्टे यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेल्या भूमिकांपैकी एक ठरली. या मालिकेत ब्रायन क्रॅन्स्टन यांनी वॉल्टर व्हाइट, तर अॅना गन यांनी स्कायलर व्हाइट यांची भूमिका साकारली होती. वॉल्टर व्हाइटचा मुलगा असलेल्या फ्लिन या व्यक्तिरेखेने आपल्या साधेपणाने आणि भावनिक स्वभावाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. २००८ ते २०१३ या काळात प्रसारित झालेल्या या मालिकेच्या पाचही पर्वांमध्ये मिट्टे यांनी काम केले होते. या भूमिकेमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली.
आरजे मिट्टे यांना वयाच्या तिसऱ्या वर्षी सेरेब्रल पाल्सी असल्याचे निदान झाले होते. शरीराच्या हालचाली आणि समन्वयावर परिणाम करणाऱ्या या स्थितीचा अनुभव त्यांनी आपल्या अभिनयातून प्रभावीपणे मांडला. विशेष म्हणजे, ‘ब्रेकिंग बॅड’मधील फ्लिन या व्यक्तिरेखेलाही सेरेब्रल पाल्सी असल्याचे दाखवण्यात आले होते. स्वतःच्या अनुभवांचा आधार घेत त्यांनी या भूमिकेत वास्तववादी भावविश्व निर्माण केले. त्यामुळे त्यांचा अभिनय केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहिला नाही, तर दिव्यांग व्यक्तींचे प्रतिनिधित्व, त्यांच्या दैनंदिन आव्हानांबद्दल जागरूकता आणि समाजातील समावेशकतेचा मुद्दा पुढे आणण्यातही त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
अभिनयासोबतच आरजे मिट्टे हे दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जात होते. त्यांनी युनायटेड सेरेब्रल पाल्सी आणि श्रायनर्स चिल्ड्रन्स यांसारख्या संस्थांसाठी राजदूत म्हणून काम केले होते. तसेच, मिट्टे फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. दिव्यांग व्यक्तींना समाजात समान संधी मिळाव्यात, मनोरंजनविश्वात त्यांचे प्रतिनिधित्व वाढावे आणि त्यांच्याबद्दलचे पारंपरिक समज दूर व्हावेत, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रासह दिव्यांगांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या समुदायाचेही मोठे नुकसान झाले आहे.AS