अनिल कांबळे
नागपूर,
crime news आंघोळ करत असलेल्या २३ वर्षीय तरुणीचे तिच्या नकळत मोबाईलवर चित्रीकरण केल्यासह तिच्याकडे वारंवार शारीरिक संबंधांची मागणी केल्याच्या आरोपावरून जरीपटका पोलिसांनी ४२ वर्षीय नातेवाईक युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, आरोपी हा वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये भागीदार असून, तो पीडित तरुणीच्या परिसरातच राहतो. तरुणी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. आरोपीने अनेकदा तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. तरुणी घरातील बाथरूममध्ये आंघोळ करीत होती. दरम्यान, आरोपी नातेवाईक युवक घरी आला. तो बेडरुममध्ये शिरला आणि त्यावेळी तरुणीला आंघोळ करताना चोरुन बघितले. त्यानंतर आरोपीने तिच्या नकळत आणि संमतीशिवाय मोबाईलवर तिचे चित्रीकरण केले. हा प्रकार लक्षात येताच तरुणीने लगेच बाथरुमचा दरवाजा लावला. लगबगीने आंघोळ केल्यानंतर ती भीतीच्या सावटाखाली बाहेर आली. तिने सर्वप्रथम त्याला विरोध केला. त्यानंतर संबंधित व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितले. परंतु, तो ऐकायला तयार नव्हता. शारीरिक संबंध ठेवण्यास दबाव टाकत होता. शारीरिक संबंधास नकार दिल्यास फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. तेवढी वेळ मारुन नेण्यासाठी तरुणीने आटापीटा केला. मात्र, त्याने फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले नाही.crime news समाजात बदनामी होईल आणि सोशल मीडियावर फोटो टाकण्याच्या भीतीपोटी तरुणीने आईशी चर्चा केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. पीडितेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील लैंगिक छळ, खासगी अवस्थेतील महिलेचे चोरून चित्रीकरण आणि महिलेच्या विनयशीलतेचा अवमान करण्यासंबंधीच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.