वर्धेत दुर्गादर्शनासाठी १० ते १०० रुपयांचे तिकीट!

कृष्णनगरात तर प्रवेशच नाही; पैसे न देणाऱ्या भाविकांना परत पाठविले

    दिनांक :13-Oct-2026
Total Views |
वर्धा,
Tickets costing ₹10 to ₹100 for Durga Darshan in Wardha! दुर्गादर्शनासाठी आलेल्या भाविकांना श्रद्धेपेक्षा तिकिटाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रकार वर्ध्यातील काही दुर्गा मंडळांमध्ये सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. सार्वजनिक दुर्गोत्सवात सहयोग राशीच्या नावाखाली १० ते १०० रुपयांपर्यंत तिकिटांची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. कृष्णनगरातील एका दुर्गा मंडळात तर दहा रुपयांचे तिकीट घेतल्याशिवाय प्रवेशच दिला जात नसल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. त्यामुळे दुर्गादर्शनासाठी आलेल्या गरीब भाविकांना देवीच्या मंडपातूनच दर्शन न घेता परतावे लागल्याची वेळ आली आहे. वर्ध्यातील दुर्गोत्सवाची ख्याती दूरवर पसरलेली आहे. वर्धा शहरासह परिसरातील जवळपास १४ गावांमधील नागरिक दर्शनासाठी येतात. लेकराबाळांसह देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची गर्दी वाढू लागली असतानाच काही मंडळांमध्ये सहयोग राशीच्या नावाखाली तिकीट आकारले जात आहे. दहा रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंतच्या तिकिटांमुळे सार्वजनिक उत्सवातील दर्शनाच्या स्वरूपावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
 

Tickets costing ₹10 to ₹100 for Durga Darshan in Wardha! 
 
 
कृष्णनगरात एकाला लागून एक अशी दोन दुर्गा मंडळे उभारण्यात आली आहेत. त्यापैकी एका मंडळात तिकीट न काढलेल्या भाविकांनाही समजून घेत दर्शनासाठी प्रवेश दिला जातो मात्र, शेजारील मंडळात दहा रुपयांचे तिकीट घेतल्याशिवाय प्रवेश नाही, असा कडक नियम करण्यात आला आहे. तिकीट न घेता प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाविकांना हात धरून बाहेर काढण्यात येते. इतकेच नव्हे, तर त्यांची टिंगलटवाळी करण्यात येते. या प्रकारामुळे काही गरीब भाविकांना देवीचे दर्शन न घेताच मंडपातून परतावे लागल्याचे चित्र समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आर्वी नाका चौक परिसरातही सहयोग राशीच्या नावाखाली पैसे गोळा केले जात असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी यासाठी लॉटरी असे नाव वापरले जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सहयोग राशी, लॉटरी आणि प्रवेश शुल्क यांतील नेमका फरक काय, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
यंदा शहरात दुर्गादेवी मंडळांची संख्या आणि रस्त्यांवरील मंडपांची गर्दी वाढते आहे. आधीच अतिक्रमणांमुळे बाजारपेठेतील अनेक रस्ते अरुंद झाले आहेत. त्यात काही मंडळांकडून सायंकाळी सहा वाजल्यानंतर बांबू आडवे लावून रस्ते बंद केले जात असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. वाहतुकीची कोंडी, रस्ते बंद होणे आणि दर्शनासाठी आकारले जाणारे पैसे या सगळ्यांमुळे दुर्गोत्सवाबाबत नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे.
 
 
सहयोग राशी आणि लॉटरीसाठी शासकीय नियमांचे पालन केले जाते का? हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. संबंधित मंडळांनी आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का, पैसे गोळा करण्यासाठी कोणत्या अटी लागू आहेत आणि लॉटरीच्या स्वरूपातील उपक्रमांना परवानगी आहे का, याची प्रशासनाने पडताळणी करावी, अशी मागणी होत आहे. या बाबींची अधिकृत माहिती आणि संबंधित मंडळांची बाजू समोर येणेही आवश्यक आहे. दरम्यान, दुर्गा मंडळांच्या सदस्यांकडून उत्सवासाठी मोठा खर्च केला जातो. हा खर्च भरून काढायचा कसा, असा सवाल काही सदस्य उपस्थित करीत आहेत. भाविकांना देवीच्या दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण आम्ही दिलेले नाही, असा खुलासाही काही मंडळांच्या सदस्यांकडून करण्यात आला. देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या भाविकाची आर्थिक परिस्थिती पाहून त्याच्या श्रद्धेचे मोजमाप होऊ नये, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. उत्सवासाठी वर्गणी किंवा सहयोग राशी गोळा करण्याचे मार्ग असू शकतात; मात्र, त्यातून सामान्य भाविकांचा अपमान होणार नाही, याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. देवीच्या दर्शनासाठी तिकीट की श्रद्धेचा अधिकार? हा प्रश्न आता वर्धेच्या दुर्गोत्सवाच्या निमित्ताने चर्चेत आला आहे. प्रशासनाने संबंधित मंडळांच्या आर्थिक व्यवहारांची, परवानग्यांची आणि प्रवेश व्यवस्थेची नियमानुसार चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. दुर्गोत्सवाची भव्यता कायम राहावी; पण त्या भव्यतेच्या दारात एखाद्या गरीब भाविकाची श्रद्धा पैशाअभावी अडवली जाऊ नये, एवढीच अपेक्षा!