वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी

    दिनांक :13-Oct-2026
Total Views |
मूल
tiger-attack तालुक्यातील चिचाळा येथील गुराखी मारोती उद्धव कोठारे हे जंगलामध्ये गुरे राखण्यासाठी गेले असता मंगळवार, 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान वाघाने त्याच्यांवर अचानक हल्ला केला. वाघाची आणि गुराखी यांची झुंझ चालू असता सोबतच्या गुराख्यांनी तात्काळ धाव घेतली आणि आरडाओरड करून वाघाला पळवून लावले. परंतु वाघाने अचानक हल्ला केल्यामुळे गुराखी गंभीर जखमी झाला.

tiger 
जखमी झालेल्या गुराख्याला मूल उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात वनविभागाच्या वाहनाने नेण्यात आले. यावेळी नागरिकांनी चिचपल्लीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर यांच्याशी संपर्क साधून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा तसेच जखमी गुराख्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांना आर्थिक स्वरूपाची जास्त्तीत जास्त मदत करा, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
मागील काही दिवसांपासून मूल तालुका तसेच लगतचा सावली व पोंभुर्णा तालुक्यात देखील वाघाच्या हल्ल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करून वाघ व इतर हिंस्त्र वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. मात्र शासन, प्रशासन लक्ष देत नसल्याने मानव वन्यजीव संघर्ष वाढतच चालला आहे. शासनाने याबाबत तातडीने दखल घेण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात मोठी घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.