प्रणव सातोकर
नागपूर
traditional-musicians उत्सवांच्या मिरवणुका म्हटल्या की कानठळ्या बसवणारा डीजेचा आवाज, ध्वनिक्षेपकांचा दणदणाट आणि विजेच्या रोषणाईचा झगमगाट, असे चित्र अलीकडच्या काळात सर्वत्र दिसू लागले होते. या आधुनिक ध्वनिसंस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक वाद्यकला आणि त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या कलाकारांचे अस्तित्वच धोक्यात आले होते. आता नागपूर शहरात डीजेच्या वापरावर आलेल्या निर्बंधांमुळे या पारंपरिक कलाविश्वाला पुन्हा नवसंजीवनी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. गणपती विसर्जनाच्या मिरवणुका, देवीचे आगमन-विसर्जन आणि अन्य सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ब्रास बँड, धुमाल पार्टी, संदल आणि पारंपरिक बँड पथकांकडे आयोजकांचा ओढा वाढत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या कलाकारांच्या हाताला पुन्हा काम मिळू लागले आहे.

डीजेच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक वाद्यपथकांना हळूहळू मिरवणुकांमधून बाजूला सारले जात होते. कमी वेळेत अधिक आवाज आणि आकर्षक सादरीकरणाच्या स्पर्धेत पारंपरिक वाद्यांचे महत्त्व कमी होत गेले. परिणामी, ढोल-ताशा, ब्रास बँड, धुमाल आणि संदल वाजवणाऱ्या अनेक कलाकारांसमोर आर्थिक संकट उभे राहिले. काही कलाकारांना लग्नसमारंभांच्या हंगामावरच अवलंबून राहावे लागत होते. वर्षभर नियमित काम मिळत नसल्याने वाद्यांची देखभाल, पथकातील सदस्यांचा खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण बनले होते. आता डीजेच्या वापरावरील निर्बंधांमुळे आयोजक पारंपरिक वाद्यपथकांकडे पुन्हा वळत असल्याचे चित्र आहे.
न्यायालयीन आदेश आणि ध्वनिप्रदूषणविषयक नियमांच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात डीजेच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या कारवाईमुळेही या विषयाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. परिणामी, उत्सवांमध्ये ध्वनिव्यवस्थेच्या पर्यायांचा विचार करताना पारंपरिक वाद्यपथकांना पुन्हा प्राधान्य मिळू लागले आहे.
पारंपरिक बँड, धुमाल आणि संदल ही केवळ मनोरंजनाची साधने नाहीत, तर अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आणि स्थानिक सांस्कृतिक परंपरेचा भाग आहेत. या कलाकारांना सातत्याने काम मिळाल्यास त्यांच्या कलेचे जतन होण्यासोबतच पुढील पिढीलाही या क्षेत्रात रोजगाराची प्रेरणा मिळू शकते.
हा बदल स्थानिक कलाकारांच्या रोजगाराला आधार देणारा आणि उत्सवांच्या सांस्कृतिक मुळांशी पुन्हा नाते जोडणारा ठरू शकतो. नागपूरच्या उत्सवांमध्ये यंदा वाद्यांचा नाद घुमताना अनेक कलाकारांच्या घरातही आर्थिक स्थैर्याची नवी आशा निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
देवी विसर्जनासाठी आतापासूनच बुकिंग
देवी विसर्जनाच्या मिरवणुकांसाठी व इतर शुभकार्यांसाठी आतापासूनच मोठ्या प्रमाणात बुकिंग सुरू झाली आहे. पारंपरिक वाद्यपथकांकडे वाढत असलेली मागणी कलाकारांसाठी आशादायक ठरत आहे. गेल्या काही वर्षांत डीजेच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक बँड पथकांना मिळणाऱ्या कामाच्या संधी अत्यंत कमी झाल्या होत्या. आता पुन्हा बुकिंग सुरू झाल्याने वादक, वाद्यवृंदातील कर्मचारी आणि या व्यवसायाशी संबंधित अन्य घटकांना आर्थिक आधार मिळत आहे.
— लाहानूजी इंगळे, अध्यक्ष, नागपूर बँड असोसिएशन