वाशीम,
Vaibhav Sarnaik महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) अधिकार्याला त्यांच्या शासकीय कार्यालयात जावून मारहाण करणे व शासकीय कामात अडथळा निर्माण करणे या प्रकरणी वाशीम जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव प्रतापराव सरनाईक यांना वाशीम जिल्हा व सत्र न्यायालयाने आज, १३ ऑटोबर २०२६ रोजी ४ वर्षांच्या सश्रम कारावासाची आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त २ महिने साध्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी हा निकाल दिला.
प्राप्त माहितीनुसार, ३० ऑटोबर २०२३ रोजी महावितरणच्या पुसद नाका वाशीम कार्यालयात तत्कालीन सहाय्यक अभियंता संजय कौतिक माळी हे आपले शासकीय काम करत होते. त्या वेळी आरोपी वैभव सरनाईक तेथे गेले आणि माझ्या लोकांना रोहित्र (डीपी) का देत नाही? असा जाब विचारत त्यांनी सहाय्यक अभियंता संजय माळी यांच्या कानशिलात मारली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेबाबत सहाय्यक अभियंता संजय माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाशीम शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३, ३३२, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी संपूर्ण तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.न्यायालयासमोर आरोपीने गुन्हा नाकारल्याने सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. तसेच घटनास्थळाचे व कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पुराव्यादाखल सादर Vaibhav Sarnaik करण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष आणि सीसीटीव्ही फुटेज यावरून न्यायालयाने आरोपीविरुद्ध कलम ३५३ आणि ३३२ अन्वये गुन्हा सिद्ध मानून वैभव सरनाईक यांना ४ वर्षे सश्रम कारावास व ५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दोन्ही कलमांतर्गत मिळालेली शिक्षा ही एकत्रित भोगावयाची आहे.
सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील म्हणून अॅड. पुरुषोत्तम एस. ढोबळे यांनी काम पाहिले. तपासाची धुरा पोलिस उपनिरीक्षक देविदास झुंगे यांनी सांभाळली, तर कोर्ट पैरवी म्हणून वाशीम शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार अजय यांनी सहकार्य केले.