गोंदिया,
wild-boar मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने सालेकसा येथील रतन अंडा सेंटर अँड कोल्ड्रिंक्स या दुकानात मंगळवारी १३ ऑक्टोबर रोजी छापामार कारवाई केली. यावेळी दुकानातील फ्रिजमध्ये रानडुकराचे मांस आढळून आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विभागातर्फे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत वनगुन्हा नोंदिवण्यात आला असून दुकानमालक पुरुषोत्तम सुरेश भांडारकर रा. सालेकसा आणि राजेंद्र टेकचंद ढेकवार रा. जांभळी या दोघांना अटक केली आहे.

सालेकसा येथील पुरुषोत्तम भांडारकर यांच्या मालकीच्या रतन अंडा सेंटर अँड कोल्ड्रिंक्स या दुकानात वनविभागाच्या कर्मचार्यांनी तपासणी केली असता फ्रिजमध्ये १० पॉलिथीन पिशव्यांमध्ये कच्चे मांस आढळले. या मांसाबाबत चौकशी केली असता ते रानडुकराचे असल्याचे समोर आले. तसेच, हे मांस राजेंद्र ढेकवार यांनी आणून दिल्याचे दुकानमालकाने पथकाला सांगितले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वनविभागाने दोघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. वन्यप्राण्यांच्या शिकारीसह त्यांच्या मांसाची साठवणूक, वाहतूक आणि विक्रीसंदर्भातील बाबींचा तपास आता वनविभागाकडून केला जात आहे. पुढील तपास उपवनसंरक्षक व सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी ए. बी. वाळके करीत आहेत.
मांसाचा स्रोत आणि इतर सहभागींचा शोध सुरू
रानडुकराचे मांस कुठून आणण्यात आले, ते दुकानात कोणत्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आले होते, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, या बाबींचा मपास वनविभागाकडून करण्यात येत असून यात वन्यजीवांची शिकार करणार्याच्या मोठ्या रॉकेटचा तर सहभाग नाही याकडेही लक्ष लागून आहे.