मुंबई,
anil-kakodkar-panel-data-center-policyराज्यातील डाटा सेंटर क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, ऊर्जा उपलब्धता, तांत्रिक क्षमता, गुंतवणूक आणि धोरणात्मक बाबींचा अभ्यास करण्यासाठी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. डाटा सेंटरच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन राज्याची दीर्घकालीन दिशा निश्चित करण्यासाठी ही समिती शासनाला शिफारसी करणार आहे.

समितीमध्ये माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, उद्योग, दूरसंचार, वित्त, पायाभूत सुविधा आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात येणार आहे. राज्यातील विद्यमान डाटा सेंटरची क्षमता, भविष्यातील मागणी, वीजपुरवठा, पाणी, कनेक्टिव्हिटी, जमीन, पर्यावरणीय परिणाम आणि आपत्ती व्यवस्थापन यांचा समितीकडून सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. डाटा सेंटर उभारणीसाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणा, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठीच्या उपाययोजना, परवानगी प्रक्रिया सुलभ करणे, अक्षय ऊर्जेचा वापर आणि ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अवलंब याबाबत समिती शासनाला सूचना करणार आहे. तसेच राज्यातील विविध भागांमध्ये डाटा सेंटर उभारणीसाठी उपलब्ध असलेल्या संधींचे मूल्यांकनही केले जाणार आहे.
डिजिटल सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कॉम्प्युटिंग, ई-कॉमर्स, वित्तीय तंत्रज्ञान आणि ई-गव्हर्नन्सच्या विस्तारामुळे डाटा सेंटरची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला देशातील आघाडीचे डाटा सेंटर हब बनविण्यासाठी आवश्यक कृती आराखडा तयार करण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे.
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी करणार उपाययोजना
समिती विविध शासकीय विभाग, उद्योग संघटना, तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांशी चर्चा करून आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे. समितीच्या शिफारसींच्या आधारे राज्याच्या डाटा सेंटर धोरणात आवश्यक बदल करण्यात येणार असून, रोजगारनिर्मिती आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पुढील उपाययोजना निश्चित केल्या जातील.