‘पैसे नाहीत ’ बेशुद्ध चिमुरडीला रुग्णवाहिकेतून उतरविले

    दिनांक :14-Oct-2026
Total Views |
मुंबई
beed shocking incident पैसा जीवनात महत्त्वाचा असला, तरी त्यापेक्षा माणुसकी मोठी असते. मात्र, पैशांअभावी एका बेशुद्ध चिमुरडीला रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यात आल्याच्या कथित प्रकारामुळे बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. फिट आल्याने बेशुद्ध पडलेल्या पाचवीत शिकणाऱ्या मुलीला पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवायचे होते. त्यासाठी शासकीय रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली. मात्र, डिझेलच्या पैशांवरून वाद झाल्यानंतर मुलीला रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे शासकीय आरोग्य व्यवस्थेतील संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
 

beed shocking incident unconscious girl allegedly removed from ambulance over diesel money 
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, दिंद्रुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाचवीत शिकणाऱ्या मुलीला फिट आल्याने उपचारासाठी आणण्यात आले होते. ती बेशुद्ध असल्याने तिला पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला आणि रेफर लेटर देण्यात आले. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने खासगी वाहनाने मुलीला घेऊन जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मुलीच्या आजीने शासकीय रुग्णवाहिकेची मागणी केली.
मुलीला रुग्णवाहिकेत ठेवून तिचे वडीलही वाहनात बसले. त्यानंतर डिझेलसाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. आपण मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असून, पैसे देण्याची परिस्थिती नसल्याचे सांगितल्यानंतर डॉक्टरांनी कथितरीत्या, ‘पैसे नाहीत तर मुलीला जन्मच कशाला दिला?’ असे अपमानास्पद वक्तव्य केल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर बेशुद्ध मुलीला रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यात आल्याचा आरोप आहे.
 
 
हतबल बापाने बेशुद्ध मुलीला खांद्यावर घेतले
मुलीला तातडीने पुढील उपचारांची गरज असताना रुग्णवाहिकेतून खाली उतरवल्याने तिच्या वडिलांसमोर मोठे संकट उभे राहिले. दुसरा पर्याय नसल्याने हतबल झालेल्या वडिलांनी बेशुद्ध मुलीला खांद्यावर घेत दुसऱ्या रुग्णालयाकडे धाव घेतली. तेथे मुलगी शुद्धीवर आल्यानंतर कुटुंबीय तिला घरी घेऊन गेले, अशी माहिती समोर आली आहे.या चिमुरडीने सहा वर्षांपूर्वीच आई गमावली असून, तिचे कुटुंब अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत आहे. मुलीच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
 
 

डॉक्टरांकडून दिलगिरी; चौकशीची मागणी
या घटनेची माहिती समोर आल्यानंतर beed shocking incident  नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही डिझेलसाठी पैसे मागण्यात आल्याचा आरोप गंभीर मानला जात असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून बोलताना दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले आहे.दुसरीकडे, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना डॉक्टर निलेश ढाकणे यांनी सांगितले की, मुलीला आरोग्य केंद्रात आणण्यात आले तेव्हा ती बेशुद्ध होती. तिला शुद्धीवर आणण्यासाठी आपण स्वतःच्या पैशांतून इंजेक्शन दिल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच, ‘माझ्या तोंडून जे काही शब्द गेले आहेत, त्याची पुनरावृत्ती यापुढे होणार नाही, याची मी काळजी घेईन,’ असे त्यांनी सांगितल्याचे समजते.दरम्यान, गावकऱ्यांनी रुग्णालयात जाऊन या प्रकाराबाबत जाब विचारला असता डॉक्टरांनी माफी मागितल्याचे सांगण्यात येत आहे. भविष्यात अशा प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, अशी भूमिका गावकऱ्यांनी मांडली आहे. आता या प्रकरणात आरोग्य विभागाकडून नेमकी काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.