अधिकारी नव्हे, शिक्षक बनून बीइओ सुरज वागस्कर वर्गात

    दिनांक :14-Oct-2026
Total Views |
अहेरी,
beo-suraj-wagaskar ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी आणि शाळांमधील व्यवस्था सुरळीत राहावी, या उद्देशाने अहेरीचे गटशिक्षणाधिकारी सुरज वागस्कर यांनी तालुक्यातील शाळांना अचानक भेटी देण्याचा धडाका सुरू केला आहे. 13 ऑक्टोबर रोजी त्यांनी पेरमिली केंद्रातील विविध शाळांना अचानक भेट देऊन शैक्षणिक स्थिती, पोषण आहार आणि भौतिक सुविधांची पाहणी केली. गटशिक्षणाधिकार्‍यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे शालेय वर्तुळात चांगलीच धावपळ उडाली.
 
 
beo-suraj-wagaskar
 
या दौर्‍यादरम्यान त्यांनी प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडपल्ली येथे भेट दिली. केवळ पाहणी न करता त्यांनी स्वतः वर्गात जाऊन खडू हाती घेत विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष अध्यापन केले. तसेच विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना पायाभूत अंकगणित, पाढे आणि अचूक अक्षर ओळख व्हावी, यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. याशिवाय शाळेतील शालेय पोषण आहाराचा साठा, त्याची गुणवत्ता, पिण्याचे पाणी आणि उपलब्ध भौतिक सुविधांची बारकाईने तपासणी केली. यानंतर वागस्कर यांनी पेरमिली येथील भगवंतराव हायस्कूलला भेट दिली. तिथेही त्यांनी वर्गात जाऊन प्रत्यक्ष अध्यापन करत विद्यार्थ्यांची ज्ञानपातळी जाणून घेतली. शाळेतील सोयीसुविधेची प्रत्यक्ष पाहणी केली.
 
शिक्षकांना कडक सूचना
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व बौद्धिक विकास हाच शिक्षणाचा मुख्य हेतू असला पाहिजे. प्रत्येक शिक्षकाने गुणवत्तेवर भर देऊन विद्यार्थ्यांचा पाया पक्का करावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षकांना दिल्या. तालुक्यातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी अशा प्रकारच्या अचानक भेटींची मोहीम यापुढेही नियमितपणे सुरूच राहणार असून, सर्व शाळांमधील शैक्षणिक व प्रशासकीय बाबींवर बारीक लक्ष ठेवण्यात येईल, असा इशारा गटशिक्षणाधिकारी सुरज वागस्कर यांनी दिला आहे.