भंडारा
bhandara drought relief पालकमंत्र्यांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यात आक्रोश मांडणाऱ्या धोप येथील राजेंद्र सपाटे ya शेतकऱ्याने आठ दिवसांपूर्वी आत्महत्या केली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असतानाच आता राज्य सरकारने मोहाडी आणि तुमसर या दोन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला आहे. हा निर्णय दिलासा देणारा असला तरी एका शेतकऱ्याचा जीव गेल्याची हळहळ व्यक्त कोट आहे.
दुष्काळाची झळ संपूर्ण जिल्ह्याला बसत असताना पहिल्या यादीत भंडारा, पवनी आणि लाखांदूर या तीनच तालुक्यांचा समावेश करण्यात आला होता. उर्वरित मोहाडी, तुमसर, लाखनी आणि साकोली तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा पडली. पावसातील खंड, असमान पर्जन्यमान, धानपिकांवरील रोगराई आणि उत्पादनात घट होण्याची भीती या संकटांनी शेतकरी घेरलेला असताना दुष्काळाच्या सरकारी निकषांनी शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढविला. प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती आणि सरकारी यादी यांच्यातील तफावत उघड होऊ लागली.
या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर ३ ऑक्टोबरला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दुष्काळी भागाचा पाहणी दौरा केला. मोहाडी तालुक्यातील धोप येथील राजेंद्र सपाटे यांनी याच दौऱ्यात मंत्र्यांसमोर अश्रू ढाळत आपली व्यथा मांडली. शेतीचे संकट, कर्जाचा भार आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांनी त्यांना घेरले होते. मात्र, या आक्रोशानंतरही ८ ऑक्टोबरला त्यांनी विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले. शेतकऱ्याच्या या मृत्यूने दुष्काळी मदतीच्या दाव्यांपुढे अस्वस्थ करणारे प्रश्न उभे केले.
शेतकऱ्यांच्या संतापाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ४० नवीन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला. यात मोहाडी आणि तुमसरचा समावेश झाल्याने भंडारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे. भंडारा, पवनी, लाखांदूर, मोहाडी आणि तुमसर या तालुक्यांना आता दुष्काळग्रस्त दर्जा मिळाला असला, तरी लाखनी आणि साकोलीतील शेतकऱ्यांचा प्रश्न अद्याप कायम आहे.
या घोषणेमुळे पीककर्ज पुनर्रचना, जमीन महसुलात सवलत, वीजबिलासंबंधी सवलती आणि आपत्ती मदतीच्या योजनांचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
मात्र, घोषणा झाल्यानंतर मदतीची अंमलबजावणी किती वेगाने होते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
बोअरवेल खोदण्यावर बंदी
संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी भंडारा यांनी एक आदेश काढून पाणीटंचाई निवारणार्थ केल्या जाणाऱ्या बोअरवेल खोदकामा व्यतिरिक्त खाजगी व्यक्ती, शेतमालक, गृहनिर्माण संस्था, बांधकाम व्यवसाय, उद्योग अशा ठिकाणी बोअरवेल खोदण्यास बंदी टाकण्यात आली आहे. हा आदेश बोरवेल खोदणाऱ्या कंत्राटदारालाही लागू असून भंडारा जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात हे निर्बंध राहणार आहेत. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना आदेशाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने कारवाई करावयाची असून उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. जी खोदकामे सुरू असतील ती ताबडतोब बंद करण्याच्या सूचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत.
....