नीट पेपरफुटीचा सीबीआय तपास पूर्ण

NTAची ती चूक.. मात्र थेट सहभाग नाही

    दिनांक :14-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली  
neet paper leak देशभरात प्रचंड गदारोळ उठवून देणाऱ्या ‘नीट-यूजी 2026’ प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाचा केंद्रीय अन्वेषण विभागाने सखोल तपास पूर्ण केला आहे. सीबीआयने या प्रकरणी दिल्ली न्यायालयात आपली पुरवणी चार्जशीट दाखल केली असून, यासह तपासाचा अंतिम टप्पा गाठल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. एका वृत्तानुसार, या संपूर्ण घोटाळ्यात राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेच्या कोणत्याही अधिकृत सरकारी कर्मचाऱ्याचा किंवा अधिकाऱ्याचा थेट सहभाग असल्याचे पुरावे मिळालेले नाहीत.
 

neet paper leak
अधिकाऱ्यांना क्लीन चीट
सीबीआयने नव्याने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रामध्ये एका खासगी व्यक्तीचे नाव समाविष्ट केले आहे, तर यापूर्वी 28 जुलै रोजी सादर केलेल्या पहिल्या चार्जशीटमध्ये 13 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते. सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एनटीए किंवा कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याचा यात हात होता का, याची अत्यंत बारकाईने चौकशी करण्यात आली. मात्र, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याविरोधात ठोस पुरावा आढळला नाही. या चार्जशीटमध्ये फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आणि दिल्ली विद्यापीठाच्या तज्ज्ञांचे तांत्रिक अहवालही जोडण्यात आले आहेत.

3 विषय तज्ज्ञांच्या चुकीमुळे फुटला होता पेपर

सीबीआयने या गुन्ह्यात आरोपींवर फसवणूक, कट रचणे, विश्वासघात आणि ‘सार्वजनिक परीक्षा कायदा 2024’ अंतर्गत खटला भरला आहे. न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी सीबीआयने खालील महत्त्वपूर्ण पुरावे सादर केले आहेत:
पुराव्यांची संख्या: 360 साक्षीदार, 422 दस्तऐवज आणि 43 वस्तू/पुरावे सादर करण्यात आले आहेत.
एनटीएची मोठी चूक: सीबीआयच्या पहिल्या आरोपपत्रानुसार, प्रश्नपत्रिका तयार करताना एनटीएच्या कार्यपद्धतीत मोठ्या त्रुटी राहिल्याचे समोर आले. एनटीएने प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर याच 3 विषय तज्ज्ञांना सर्व चारही ‘मास्टर क्वेश्चन सेट’ पाहण्याची परवानगी दिली होती.
दोषी तज्ज्ञांची नावे: मनीषा गुरुनाथ मांढरे (बॉटनी व झुऑलॉजी), प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी (केमिस्ट्री) आणि मनीषा संजय हवालदार (फिजिक्स) या तीन तज्ज्ञांकडे प्रश्नपत्रिकांचा ताबा दीर्घकाळ राहिल्यामुळे पेपर लीक झाला.