मुंबई
drought hit talukas राज्यात दुष्काळाचा विळखा आणखी तीव्र झाला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांव्यतिरिक्त आज सरकारने आणखी 40 नव्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. 40 तालुक्यांच्या यादीत राज्यातील 12 जिल्ह्यांतील तालुक्यांचा समावेश आहे. या यादीत सांगली आणि गोंदिया जिल्ह्यांतील प्रत्येकी 7 तालुके आहेत. सातारा जिल्ह्यातील 5, तर चंद्रपूर, नाशिक, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील प्रत्येकी 3 तालुक्यांचा समावेश आहे. भंडारा, नांदेड, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रत्येकी 2 तालुके, तर वर्धा जिल्ह्यातील 1 तालुका या यादीत आहे.
दिलेल्या यादीत सांगली जिल्ह्यातील खानापूर, पलूस, शिराळा, वाळवा, कडेगाव, विटा आणि तासगाव या 7 तालुक्यांचा समावेश आहे. गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव, देवरी, सडक अर्जुनी, गोरेगाव, आमगाव, सालेकसा आणि गोंदिया या 7 तालुक्यांची नोंद आहे. सातारा जिल्ह्यात पाटण, जावळी, कराड, कोरेगाव आणि वाई या 5 तालुक्यांचा समावेश आहे.
भंडारा जिल्ह्यात मोहाडी आणि तुमसर, नांदेड जिल्ह्यात मुदखेड आणि मुखेड, पुणे जिल्ह्यात आंबेगाव आणि जुन्नर, तर कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी आणि शिरोळ या तालुक्यांची नोंद आहे. वर्धा जिल्ह्यात कारंजा हा एक तालुका या यादीत आहे. कोकणातील पालघर जिल्ह्यात जव्हार, मोखाडा आणि तलासरी या 3 तालुक्यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लांजा, मंडणगड आणि खेड या 3 तालुक्यांची नोंद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी या 3 तालुक्यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात चांदवड, त्र्यंबकेश्वर आणि निफाड हे 3 तालुके आहेत.