आचार्य पदवी संशोधनाकरिता पात्रता पेट परीक्षा घ्या

    दिनांक :14-Oct-2026
Total Views |
गडचिरोली,
gadchiroli गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर संघटनेच्या वतीने आचार्य पदवीकरता पात्रता परीक्षा म्हणून पेट परीक्षा घेण्यासंबंधी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव डॉ. विवेक गोर्लावार, उपाध्यक्ष डॉ. विजय वाढई, संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. रामदास कामडी, डॉ. अक्षय धोटे, डॉ.राहुल सावलीकर आदी उपस्थित होते. यावेळी कुलगुरूंनी पेट परीक्षेचे परिपत्रक तत्काळ निर्गमित करण्यासंबंधी आश्‍वासित केले आहे. गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेच्या वतीने याआधी आचार्य पदवी संशोधनाकरिता पात्रता पेट परिक्षा घेण्याबाबत अनेक निवेदने दिलेली आहेत.
 
 
gadchiroli
 
मात्र त्याबाबत प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही, याकरिता पुन्हा संबंधित समस्या सोडवणुकीसाठी संघटनेच्या वतीने निवेदन देऊन पेट परीक्षेसंदर्भातील भूमिका कुलगुरूंना समजावून सांगण्यात आली. आचार्य पदवीकरिता प्रवेश पात्रता परिक्षा म्हणून मुंबई विद्यापीठ, मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, राष्ट्रसंत. तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ, अशी अनेक नामांकित विद्यापीठे आचार्य पदवीकरिता पात्रता परिक्षा म्हणून पेट परिक्षा घेऊन विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. मात्र गोंडवाना विद्यापीठाने सप्टेंबर-2023 पासून पेट पात्रता परिक्षा घेणे बंद केली असून ग्रामीण-आदिवासीबहुल भागातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या संशोधनाची दारे बंद झाली असल्याचे संघटनेच्या वतीने कुलगुरूंना सांगण्यात आले.
 
 
विशेष म्हणजे याआधी गोंडवाना विद्यापीठाच्या विद्या परिषद, अधिसभा व व्यवस्थापन परिषद सभेमध्ये पेट परिक्षा घेण्याविषयी सविस्तर चर्चा होऊन पेट परिक्षा घेण्याविषयी मान्यता दिलेली आहे. मात्र अनेक महिने लोटूनही गोंडवाना विद्यापीठाने पेट परिक्षा घेण्याविषयी परिपत्रक निर्गमित केलेले नाही.