शेफ विष्णू मनोहर भारताचं प्रतिनिधित्व इस्रायलमध्ये करणार!

    दिनांक :14-Oct-2026
Total Views |
नागपूर,
indian-chef-vishnu-manohar-israel-visitभारतीय पाककला संस्कृतीचे जतन आणि जागतिक स्तरावर प्रसार करणारे नागपूरचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्यात तेल अवीव येथे होणाऱ्या ‘क्युरेटेड कलिनरी अँड कल्चरल एंगेजमेंट’ या सांस्कृतिक व पाककला परिसंवादात ते भारताचे प्रतिनिधित्व करतील. या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी भारतातून केवळ दोन शेफची निवड झाली असून, ही भारतीय पाककला क्षेत्रासाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे.
 
chef
 
 
४ दशकांची कारकीर्द आणि ३५ जागतिक विक्रम
गेल्या ४० वर्षांपासून पाककला क्षेत्रात कार्यरत असलेल्या शेफ विष्णू मनोहर यांच्या नावावर तब्बल ३५ जागतिक विक्रम नोंदवले गेले आहेत. त्यांनी आतापर्यंत ५५ हून अधिक पुस्तके लिहिली असून ५,००० पेक्षा जास्त प्रात्यक्षिक कार्यक्रम सादर केले आहेत. पारंपरिक भारतीय अन्नपरंपरेचा इतिहास आणि तिचे वैविध्य जगभरात पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
 
 
समाजसेवा आणि शैक्षणिक योगदान
पाककलेसोबतच ते शिक्षण व सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. अमेरिकेतील ‘सांता क्लारा काउंटी’ आणि ‘विदर्भ भूषण’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ते एमजीएम विद्यापीठ, संभाजीनगर येथे 'प्रोफेसर एमेरिटस' म्हणून सेवा देत आहेत. याशिवाय, बालकुपोषण मुक्तीसाठी कार्यरत अमेरिकास्थित ‘शेअर अवर स्ट्रेंथ’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी भारतात ४ कोटींहून अधिक भोजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र खाद्यसंस्कृती कोश’ उपक्रमातही त्यांचे योगदान आहे.
 
महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीला जागतिक व्यासपीठ
मुंबईतील अमेरिकेचे तत्कालीन महावाणिज्यदूत एडगार्ड डी. कॅगन यांनी २०१८ मध्ये नागपुरातील ‘विष्णुजी की रसोई’ला भेट देऊन झुणका-भाकर, वांग्याची भाजी आणि सावजी पदार्थांचे विशेष कौतुक केले होते. भारत व अमेरिकेत रेस्टॉरंट्स चालवणाऱ्या विष्णू मनोहर यांच्या या इस्रायल दौऱ्यामुळे महाराष्ट्रीयन व भारतीय खाद्यसंस्कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक ओळख मिळेल.