अनिल कांबळे
नागपूर,
justice anil kilor वकिली व्यवसायात पदार्पण करताच अनेक आव्हाने असतात. त्यामुळे ती आव्हाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पेलण्यासाठी तावून-सुलाखून सज्ज होण्याची तयारी ठेवावी लागेल. वकिलीच्या क्षेत्रात नितीमूल्ये आणि आदर-सन्मानाला महत्व असून हीच एका चांगल्या वकिलाची खरी ताकद ठरते. नागपूर बार असोसिएशनचा शंभराहून अधिक वर्षांचा आणि जागतिक दर्जाचा इतिहास हा केवळ भूतकाळातील आठवणींचा संग्रह नसून, नवीन पिढीला योग्य दिशेने वकिली करण्यासाठीचा खरा दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी केले.
स्व. ज्येष्ठ वकील श्री. विनोद बोबडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हायकोर्ट बार असोसिएशन स्टडी सर्कलच्या वतीने आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. 'बार असोसिएशनचा वारसा आणि कनिष्ठ वकिलांची भूमिका' हा या सत्राचा मुख्य विषय होता. कार्यक्रमाच्या मंचावर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अभय सांबरे आणि सचिव ॲड. श्रीरंग भोंगाडे प्रमुख उपस्थित होते. आपल्या भाषणात न्यायमूर्ती किलोर यांनी बार असोसिएशनच्या प्रतिष्ठेला साजेसे योगदान देण्याचे आवाहन केले. नागपूर बार असोसिएशनच्या स्थापनेपासूनचा इतिहास सांगताना त्यांनी, बारने देशाच्या न्यायव्यवस्थेला देऊ केलेल्या आठ न्यायमूर्तींचा उल्लेख केला. कार्यक्रमाला न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके, न्यायमूर्ती रजनीश व्यास, न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्यासह ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि नवोदित वकिलांची मोठी उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे आभार ॲड. श्रीरंग भोंगाडे यांनी मानले.
विधी महाविद्यालयात पुस्तकी ज्ञान
विधी महाविद्यालयात सर्व गोष्टी शिकता येत नसल्या तरी, प्रत्यक्ष कामात सतत शिकण्याची वृत्ती ठेवावी लागते. प्रतिकूल न्यायमूर्तींसमोर माघार न घेता तिप्पट सखोल तयारी करून जावे, असे सांगताना वकिलांचे सातत्य आणि चिकाटी पाहून न्यायमूर्तींचाही दृष्टिकोन बदलतो, असे ते म्हणाले. केवळ क्लिष्ट कायदेशीर भाषा वापरणे म्हणजे मसुदालेखन (ड्राफ्टिंग) नव्हे, तर अशिलाची बाजू घटनांच्या अचूक कालक्रमानुसार आणि कागदपत्रांच्या भक्कम आधारावर मांडणे हेच खरे मसुदालेखन असल्याचे किलोर यांनी स्पष्ट केले.