मुंबई,
keshav-upadhye-slams-rahul-gandhiलोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर राहुल गांधी देशात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. “राहुल गांधी म्हणजे मूर्तिमंत दिमागी नक्षलवादाचा चेहरा,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे केलेल्या ‘दिमागी नक्षल’ या शब्दप्रयोगाचा संदर्भ देत उपाध्ये यांनी राहुल गांधी यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. आंदोलनाचा उद्देश जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी राज्यसंस्थेविरोधात असंतोष निर्माण करणे असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावर (एसआयआर) राहुल गांधी पुराव्यांशिवाय आरोप करत असल्याचेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याचा दावा उपाध्ये यांनी केला.
राष्ट्रपतींच्या भेटीनंतर राहुल गांधी यांनी केलेल्या विधानांवरही त्यांनी आक्षेप घेतला. पुरावे सादर करण्याबाबतच्या त्यांच्या भूमिकेला उपाध्ये यांनी बेजबाबदारपणा ठरवले. सरकार, संसद आणि घटनात्मक संस्थांविषयी जनतेच्या मनात अविश्वास निर्माण करणे, सामाजिक फूट वाढवणे आणि देशातील असंतोषाला खतपाणी घालणे, असे आरोप करत उपाध्ये यांनी काँग्रेसच्या आंदोलनाच्या भूमिकेवर टीका केली. भारत जोडो यात्रेदरम्यान नक्षलवादसमर्थक संघटनांचा सहभाग असल्याचाही दावा त्यांनी केला.
राहुल गांधी यांची भूमिका दुटप्पी
डोकलाम संघर्षाच्या काळातील चीनसंबंधी संपर्क, ऑपरेशन सिंदूरवरील भूमिका आणि एलॉन मस्क यांच्या भारतविषयक वक्तव्यांवरील राहुल गांधी यांच्या प्रतिक्रियांचा दाखला देत उपाध्ये यांनी त्यांच्यावर देशविरोधी शक्तींशी सूर जुळवण्याचा आरोप केला. राहुल गांधी यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका करत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.