मुंबई,
maharashtra-women-startup-hubमहिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात राज्यस्तरीय महिला स्टार्टअप हब उभारण्यात येणार आहे. महिलांना वित्तपुरवठा, बाजारपेठ, मार्गदर्शन आणि व्यवसायवाढीसाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि उदैती फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
या उपक्रमामुळे राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण अधिक वेगाने होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील आणि उदैती फाऊंडेशनच्या संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा शर्मा गोयल यांनी करारावर स्वाक्षरी केली. हा हब शासनाचे विविध विभाग, स्टार्टअप परिसंस्था, गुंतवणूकदार आणि सहाय्यक संस्थांना एका व्यासपीठावर आणून महिला उद्योजकांसाठी नव्या संधी निर्माण करणार आहे.
महिला-नेतृत्वाखालील उद्योगांसाठी अॅक्सेलरेटर मॉडेल विकसित केले जाणार असून त्याद्वारे मार्गदर्शन, वित्तपुरवठा, बाजारपेठीय दुवे आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांशी समन्वय साधला जाईल. उदैती फाऊंडेशनकडून महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीला तांत्रिक व ज्ञानविषयक सहाय्य दिले जाणार आहे. महिला स्टार्टअप निर्देशांक विकसित करून त्याचे संस्थात्मककरण करण्याचेही नियोजन आहे.विभागनिहाय आणि जिल्हानिहाय लिंग-विभागित आकडेवारीच्या आधारे महिला उद्योजकतेतील प्रगतीचा आढावा घेता येणार असून, पुराव्यावर आधारित धोरणनिर्मितीला बळ मिळेल. यासाठी गव्हर्नन्स डॅशबोर्ड आणि आंतरविभागीय संचालन समिती स्थापन केली जाणार आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा
या करारामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल, असे पूजा शर्मा गोयल म्हणाल्या. राज्यभरातील महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देत संस्थात्मक यंत्रणा मजबूत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल. उदैती फाऊंडेशन महिलांचा उद्योग आणि रोजगार क्षेत्रातील सहभाग वाढविण्यासाठी कार्यरत असून, ‘विकसित भारत २०४७’च्या उद्दिष्टांना गती देण्यासाठी राज्य शासन व खासगी क्षेत्रासोबत सहकार्य करत आहे.