प्रणव सातोकर
नागपूर,
nagpur-jewellery-robbery-solvedबंदुकीसारख्या दिसणाऱ्या शस्त्राचा धाक दाखवून ज्वेलर्सच्या दुकानातून तब्बल ४० लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या थरारक जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तब्बल ३०० ते ४०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्त तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपींचा माग काढत उत्तर प्रदेशातील बरेली, नोएडा आणि मेरठ येथून चार आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत गुन्ह्यात वापरण्यात आलेली फॉर्च्युनर कारही जप्त करण्यात आली आहे. माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या पत्रकार परिषदेत दिली
ही घटना ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४.४० ते ४.५५ या वेळेत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा रोडवरील महाकाली बारसमोर असलेल्या ढोमणे ज्वेलर्समध्ये घडली. राकेश सुभाष ढोमणे यांचे या ठिकाणी सोने-चांदीच्या खरेदी-विक्रीचे दुकान आहे. घटनेच्या वेळी दुकानात काम करणारा शुभम खेमराज हाडगे हा उपस्थित होता.
याच वेळी चार अनोळखी व्यक्तींनी दुकानात प्रवेश केला. त्यांनी शुभमला बंदुकीसारख्या दिसणाऱ्या शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दुकानातील अंदाजे ३५० ग्रॅम वजनाचे, सुमारे ४० लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जबरीने हिसकावून घेतले. आरोपींनी शुभमला मारहाण केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही फुटेज आणि एआय तंत्रज्ञानाची मदत
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस आणि गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. परिसरातील ३०० ते ४०० सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करण्यात आले. तांत्रिक तपास, एआय तंत्रज्ञान आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची दोन पथके उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथे रवाना करण्यात आली.
या पथकांनी स्थानिक पातळीवर ओळख लपवून चार दिवस तपास केला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींची माहिती मिळविण्यात आली. तपासाची व्याप्ती वाढविण्यासाठी तिसरे पथकही रवाना करण्यात आले. सलग सात दिवस आरोपींचा माग काढल्यानंतर पोलिसांना यश मिळाले.
या कारवाईत अभिषेकसिंग ठाकूर याला बरेली येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर जयराम ऊर्फ जोगींदर अशोकसिंग ठाकूर (वय १९) आणि शुभांकीत निलेशकुमार चतुर्वेदी (वय २२) यांना नोएडा येथून, तर राजन सामी शर्मा (वय २९) याला मेरठ येथून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांचे इतर साथीदार कोण आहेत, याचा शोध सुरू आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली एमएच ४९ बी ९१९२ क्रमांकाची फॉर्च्युनर कार पोलिसांनी जप्त केली आहे.
या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांनी केलेले उत्कृष्ट टीमवर्क, तांत्रिक विश्लेषण, एआय तंत्रज्ञानाचा वापर आणि आंतरराज्यीय पोलिसांशी साधलेला समन्वय महत्त्वाचा ठरला. आरोपींचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेशातील बदायूं येथील एसडब्ल्यूएटी पथकाचे हेड कॉन्स्टेबल सचिन झा, सहारनपूर येथील पोलीस उपनिरीक्षक नीरज पवार तसेच पोलीस हवालदार हरेंद्र, अमित चिकारा, जोगेंद्र आणि पोलीस अंमलदार विवेक राणा यांनी विशेष सहकार्य केले.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध आणि गुन्ह्याशी संबंधित पुढील बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.