अनिल कांबळे
नागपूर
nhai नागपूर-काटोल राष्ट्रीय महामार्गाच्या उर्वरित कामाबाबत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) उर्वरित रस्ता सुधारणेचे काम येत्या मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले आहे.
न्यायालयाच्या २५ फेब्रुवारी २०२६ च्या आदेशाच्या अनुपालनासंदर्भात बुधवारी या याचिकेवर सुनावणी झाली. यापूर्वी एनएचएआयने २३ फेब्रुवारी २०२६ रोजी न्यायालयात शपथपत्र सादर केले होते. या शपथपत्रानुसार, नागपूर-काटोल टप्प्यातील प्रलंबित कामे ६० दिवसांच्या आत पूर्ण करण्यासाठी प्रतिवादी अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रतिवादी मेसर्स जॉइंट स्टॉक कंपनी इंडस्ट्रियल 'व्होझरोझदेनिये' असोसिएशन यांना दोष दुरुस्ती नोटीस जारी करण्यात आली होती.
कंत्राटदाराला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान एनएचएआयचे वकील अॅड. अनिष कठाणे यांनी न्यायालयात महत्त्वाचे निवेदन केले. त्यांनी सांगितले की, संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक या कंत्राटदाराला उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला, अपेक्षित प्रगती न दाखविल्यामुळे मेसर्स जॉइंट स्टॉक कंपनी इंडस्ट्रियल 'व्होझरोझदेनिये' असोसिएशन यांचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. आता या कंत्राटदाराचे उर्वरित सर्व काम एनएचएआय स्वत:च्या देखरेखीखाली पूर्ण करणार असल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. संपूर्ण महामार्गाचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही अॅड. कठाणे यांनी न्यायालयाला दिली.
पुढील सुनावणी मार्च २०२७ नंतर
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या आश्वासनाची दखल घेत हायकोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी मार्च २०२७ नंतर निश्चित केली आहे. तसेच, तोपर्यंत कामाच्या प्रगतीबाबत आणि न्यायालयाच्या आदेशांच्या अनुपालनाबाबत नवीन शपथपत्र दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश कोर्टाने दिलेत. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. रोहन धात्रक यांनी तर एनएचएआयतर्फे अॅड. अनिष कठाणे यांनी बाजू मांडली.