नागपूर,
nagpur-police-12-medals-duty-meet-2026गुन्ह्यांचा तपास, न्यायवैद्यक शास्त्र, फिंगरप्रिंट, माहिती तंत्रज्ञान आणि पोलीस व्हिडिओग्राफी अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कौशल्याची छाप उमटवत नागपूर शहर पोलिसांनी राज्यस्तरीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात दमदार कामगिरी केली आहे. पुणे येथे आयोजित २१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०२६ मध्ये नागपूर शहर पोलीस संघाने एकूण १२ पदकांची कमाई करीत राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला. यामध्ये ४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. दहशतवादविरोधी पथक (एटीएस), मुंबईने या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.
५ ते १० ऑक्टोबरदरम्यान पुण्यातील एसआरपीएफ गट क्रमांक १, हडपसर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर शहर पोलिसांच्या वतीने चार अधिकारी आणि १७ पोलीस अंमलदार अशा एकूण २१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या मेळाव्यात निरीक्षण चाचणी, व्यक्तिचित्र, फौजदारी कायदा, न्यायवैद्यक शास्त्र, वैद्यकीय कायदेशीर तपासणी, पोलीस व्हिडिओग्राफी, श्वान स्पर्धा, फिंगरप्रिंट आणि संगणक अशा विविध विषयांवर स्पर्धा घेण्यात आल्या. नागपूरच्या स्पर्धकांनी या सर्व क्षेत्रांमध्ये आपले कौशल्य सिद्ध करत १२ पदके पटकाविली.
पोलीस महासंचालकांच्या हस्ते चषक प्रदान
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते १० ऑक्टोबर रोजी उपविजेत्या नागपूर शहर पोलीस संघाला चषक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेसाठी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप चंदन यांनी समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. पोलीस निरीक्षक राखी गेडाम आणि त्यांच्या पथकाने स्पर्धकांच्या पूर्वतयारीचे नियोजन केले.
स्पर्धकांना शासकीय न्यायसहायक वैज्ञानिक संस्थेतील सहायक प्राध्यापक डॉ. आशिष बढीये आणि डॉ. नीती कपूर, फॉरेन्सिक तज्ज्ञ श्रीकांत अर्धापूरकर, सीआयडीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण मुन आणि पूजा लगस, गुन्हे अन्वेषण विभागाचे सचिन पानसे आणि अमोल सहारे तसेच जिल्हा भंडारा येथील पोलीस हवालदार दीपक बुलबुले यांनी मार्गदर्शन केले.
उपलब्ध पदक विजेत्यांच्या यादीमध्ये पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे यांनी फौजदारी कायदा परीक्षेत सुवर्णपदक, तर न्यायवैद्यक शास्त्र आणि वैद्यकीय कायदे या विषयांत प्रत्येकी रौप्यपदक मिळविले. महिला पोलीस निरीक्षक अश्विनी काळे यांनी फिंगरप्रिंट प्रात्यक्षिक स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले.
पोलीस अंमलदार कुनाल हटेवार आणि पलाश वाघमारे यांनी माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. महिला पोलीस अंमलदार प्रतीक्षा नागापुरे यांनी निरीक्षण चाचणीत सुवर्णपदकाची कमाई केली.
नागपूर शहर पोलिसांच्या या यशामुळे गुन्हे तपासातील तांत्रिक कौशल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि व्यावसायिक प्रशिक्षणाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे