लग्नासाठी तगादा लावल्याने प्रेयसीला संपविले

डोक्यावर मुसळाने वार करून हत्या; विजेच्या धक्क्याचा बनाव

    दिनांक :14-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर

nagpur wanadongri murder case लग्नासाठी तगादा लावल्याने महाविद्यालयीन जीवनापासून प्रेमसंबंध असलेल्या प्रियकरानेच प्रेयसीची हत्या केली. ही धक्कादायक घटना वानाडोंगरीत उघडकीस आली आहे. डोक्यावर मुसळाने प्रहार करून तिचा जीव घेतल्यानंतर विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा बनाव रचून आरोपीने खान्देशात पलायन केले. एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच या हत्येचा छडा लावत आरोपीला जळगाव जिल्ह्यातील रावेर येथून अटक केली. जावेद शेख सहीद मन्यार (३५, रा. शिव कॉलनी, रावेर, जि. जळगाव) असे आरोपीचे नाव असून, कविता (३५, रा. मातोश्री नगर, वानाडोंगरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
 

nagpur wanadongri murder case | boyfriend arrested in jalgaon 
१२ ऑक्टोबर रोजी सकाळी कविता घरातील स्वयंपाकघरात हिटरने पाणी गरम करीत असताना विजेचा धक्का लागल्याने ती खाली पडल्याची माहिती तिच्या पतीने एमआयडीसी पोलिसांना दिली होती. तिला तातडीने एम्स रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, शवविच्छेदन अहवालात कविताच्या डोक्यावर गंभीर प्रहार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचा संशय बळावला. हिटरचा वापर करून विजेचा धक्का लागल्याचा बनाव करण्यात आल्याची शक्यताही वैद्यकीय तपासणीतून व्यक्त झाली.
 
 
मोबाईल कॉल रेकॉर्डमुळे आरोपीचा माग
प्रारंभी पोलिसांनी कविताच्या पतीच्या भूमिकेचीही चौकशी केली. मात्र, घटनेच्या वेळी तो अन्यत्र असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर कविताच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड तपासले असता तिचा जावेद शेख सहीद याच्याशी नियमित संपर्क असल्याचे समोर आले. त्याचे लोकेशन जळगाव जिल्ह्यात आढळल्यानंतर एमआयडीसीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला रावेर येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीला १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
 
दोघेही विवाहित
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी एअर nagpur wanadongri murder case  कंडिशनर दुरुस्तीचे काम करतो. महाविद्यालयात शिकत असताना त्याचे कविताशी प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, दोघांची सामाजिक स्थिती वेगवेगळी असल्याने या प्रेमसंबंधांना तीव्र विरोध झाला. त्यानंतर दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी विवाह केले. आरोपीला चार मुले, तर कविताला दोन मुली आहेत. विवाहानंतरही दोघांचा संपर्क कायम होता. संधी मिळेल तेव्हा आरोपी कविताकडे येऊन काही दिवस राहत असे. पोळ्याच्या सणालाही तो तिच्याकडे राहून गेल्याचे तपासात समोर आले आहे. घटनेच्या वेळी कविताचा पती भंडारा येथे गेला होता, तर तिच्या दोन्ही मुली नातेवाइकांकडे गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत आरोपी तिच्या घरी आला होता. घटनेपूर्वी दोन दिवसांपासून तो तिच्याकडे मुक्कामाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लग्नाच्या मागणीवरून वाद
सोमवारी सकाळी कविताने आरोपीकडे लग्न करण्याचा आग्रह धरला. यावरून दोघांत वाद झाला. संतापलेल्या आरोपीने घरातील मुसळाने तिच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर विजेच्या कामाचे ज्ञान वापरून हिटरच्या साहाय्याने मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचा बनाव रचला आणि घटनास्थळावरून पळ काढला, असा पोलिसांचा आरोप आहे.