पाकिस्तानात रेल्वेचा भीषण अपघात!

पाच जणांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी

    दिनांक :14-Oct-2026
Total Views |
लाहोर
pakistan train accident पाकिस्तानातील पंजाब प्रांतात मंगळवारी सकाळी रेल्वेचा भीषण अपघात झाला. कराचीहून पेशावरकडे जाणारी रेहमान बाबा एक्स्प्रेस मुलतान येथील शेरशाह पुलाजवळ रुळांवरून घसरली. या दुर्घटनेत किमान पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून, सुमारे ३० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
 

pakistan train accident 5 dead, 30 injured in rehman baba express derailment 
‘जिओ न्यूज’ने पोलीस आणि बचाव पथकांच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, जखमी प्रवाशांना उपचारासाठी मुलतान येथील निश्तर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, अपघातानंतर रेल्वेतील १३ डबे रिकामे करण्यात आले. एका डब्यात बचावकार्य सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, अपघातापूर्वी रोहरीजवळ रेल्वे कर्मचाऱ्यांनी नवव्या डब्यातील नट-बोल्टची दुरुस्ती केल्याचा दावा एका प्रवाशाने पत्रकारांशी बोलताना केला. मात्र, या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. तसेच या दुरुस्तीचा रेल्वे रुळांवरून घसरण्याच्या घटनेशी काही संबंध होता का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या दुर्घटनेतील जखमी प्रवाशांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बचावकार्य वेगाने पूर्ण करण्याचे आणि जखमींना विलंब न करता सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
रेल्वे अपघाताचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. पाकिस्तान रेल्वे आणि संबंधित यंत्रणांकडून याबाबत अधिक माहिती दिली जाण्याची अपेक्षा आहे. पाकिस्तानमधील रेल्वे सुरक्षेचा प्रश्न यापूर्वीही अनेकदा ऐरणीवर आला आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये सिंध प्रांतातील नवाबशाहजवळ हजारा एक्स्प्रेस रुळांवरून घसरली होती. त्या दुर्घटनेत किमान ३० जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. ताज्या अपघातामुळे रेल्वेची देखभाल आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे.