अमरावती,
worlds-top-scientists संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे माजी प्राध्यापक आणि विभागप्रमुख प्रा. महेंद्र कुमार राय यांचा पुन्हा एकदा जगातील अव्वल 2% शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश झाला आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाने नुकतीच स्कोपस (Scopus) सायटेशन डेटाच्या आधारे जगातील अव्वल 2% शास्त्रज्ञांची यादी जाहीर केली असून, ती एल्सेव्हियर (Elsevier) मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी प्रा. राय यांना ही प्रतिष्ठेची मान्यता मिळण्याची ही सातवी वेळ आहे.

प्रा. राय यांचा शैक्षणिक आलेख अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांच्या नावावर 460 संशोधन प्रबंध, 80 पुस्तके आणि सात पेटंट आहेत. सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान आणि नॅनोटेक्नॉलॉजी या क्षेत्रांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या गुगल स्कॉलर प्रोफाइलनुसार, त्यांच्या संशोधन कार्याला 51,181 सायटेशन्स मिळाले असून, त्यांचा एच-इंडेक्स 97 आणि आय10-इंडेक्स 422 आहे. बायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री क्षेत्रात ते सध्या भारतात 6 व्या क्रमांकावर आहेत. ही मान्यता त्यांचे संशोधनातील सातत्यपूर्ण योगदान, शैक्षणिक उत्कृष्टता आणि नावीन्यतेचे प्रतीक असून, यामुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संशोधन समुदायाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.