चीनच्या मळमळीचा अर्थ

    दिनांक :14-Oct-2026
Total Views |
अग्रलेख 
editorial 1998 च्या मे महिन्यात सूर्य आग ओकत होता. उन्हाच्या काहिलीने लोक हैराण झाले होते. इकडे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरणातून येणाऱ्या ‌‘गरम‌’ हवेमुळे लवकरच काहीतरी मोठे घडणार याची चाहूल लागली होती. कॅबिनेटमधील मोजके मंत्री, गुप्तचर विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनाच पुढे येऊ घातलेल्या गोष्टीची माहिती होती. या सर्व घडामोडी होत असतानाच तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी भारताच्या सुरक्षेच्या संदर्भात ‌‘चीन हा नंबर एकचा संभाव्य धोका‌’ असल्याचे वक्तव्य करीत जगभरात खळबळ उडवून दिली. देशाचे 30 वे संरक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात त्यांनी सामरिक, परराष्ट्र संबंध आणि भू-राजकीय तज्ज्ञांना बुचकाळ्यात पाडत थेट चीनवर निशाणा साधला होता. वास्तविक पाहता फर्नांडिस यांच्या वक्तव्यात फारसे नावीन्य नव्हते. फरक एवढाच होता, की त्यांनी कोणाचीही भीडमूर्वत न ठेवता सत्य सांगून टाकले. चीनवर कधीही विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, याची जाणीव त्यांना होती. जॉर्ज फर्नांडिस यांच्या या वक्तव्याचा माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल आणि सर्व डाव्या पक्षांनी विरोध केला होता. आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडत असतानाच ११ मे १९९८ रोजी पोखरण येथे भारताने अणुस्फोटाची चाचणी केली आणि अमेरिकेसह चीन, पाकिस्तानला धक्का दिला. फर्नांडिस यांनी चीनला ‘सर्वांत मोठा संभाव्य धोका’ संबोधून जगाला चर्चेत गुंतवून ठेवले आणि इकडे पोखरणची मोहिम फत्ते झाली. तो काळ आणि ते प्रसंग आठवण्याचे कारण असे की, चीनच्या वर्तनात अद्याप बदल झालेला नाही. संधी मिळाली की भारताला डिवचणे हा चीनचा आवडता छंद आहे.
 
china ladakh
ताजे उदाहरण लडाखचे. भारत सरकारतर्फे केंद्रशासित प्रदेश लडाखमधील २८ सामरिक ठिकाणांची आणि भौगोलिक वैशिष्ट्यांची अधिकृत नोंद केली गेली. त्या माध्यमातून या ठिकाणांना अधिकृत नावे दिली गेली व त्यांचे नकाशावरील स्थान निश्चित केले गेले. यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गोगरा आणि हाटस्प्रिंग या स्थळांचा समावेश आहे. २०२० मधील गलवान संघर्षात ही दोन्ही ठिकाणे संघर्षप्रवण झाली होती. २ ऑक्टोबरला भारताने या ठिकाणांची अधिकृत नोंद केल्यानंतर दहा दिवसांनी १३ ऑक्टोबरला चीनने त्यावर आक्षेप घेतला. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी भारताचा निर्णय अमान्य असल्याचे विधान केले. लडाखसंदर्भात चीनची ही भूमिका म्हणजे निव्वळ खोडसाळपणा आहे. चीनला निर्णय अमान्य असला तरी वस्तुस्थिती बदलता येणार नाही. संपूर्ण लडाख हा आमचा अविभाज्य घटक आहे, असे प्रत्युत्तर भारताच्या परराष्ट्र खात्याने दिले. यावरून तत्कालीन संरक्षण मंत्री फर्नांडिस यांनी चीनसंदर्भात जे विधान केले होते ते किती योग्य होते हे स्पष्ट होते. आणि त्या विधानाचे महत्त्व आजही कमी झालेले नाही, हेही कळते.
चीनची भारतासंदर्भातील घातकी, दगाबाज भूमिका पूर्वापार राहिलेली आहे. त्याचा संपूर्ण लडाख आणि अरुणाचल प्रदेशवर डोळा आहे. १९६२ मध्ये खरे तर चीनला लडाख आणि अरूणाचलवर कब्जा करायचा होता. पण भारतीय सैनिकांच्या प्रतिकारामुळे सध्याच्या प्रत्यक्ष ताबारेषेच्या पुढे त्यांना जाता आले नाही. मात्र, याचा अर्थ चीनने इंच-इंच पुढे सरकत दुसऱ्याची जमीन बळकावण्याचे धोरण सोडले, असे नव्हे. या पृष्ठभूमीवर हे समजून घेतले पाहिजे की, स्थळांची नावे बदलण्याचा निर्णय साधा वाटत असला तरी लडाखच्या अधिकृत नकाशावर ही नावे अधिकृत करण्यात आली आहेत. गृहमंत्रालयाने एक प्रसिध्दिपत्रक जारी करीत नावांमध्ये बदल केला आहे. केवळ नावे बदलल्याने प्रत्यक्ष परिस्थितीत बदल होतो असे नव्हे. पण, हे एकप्रकारे सांकेतिक स्वरुपाचे युद्धच आहे. चीन अजूनही अरुणाचलमधील स्थळांची नावे बदलत आहे. २०२५ च्या मे महिन्यात चीनने तेथील तब्बल २५ ठिकाणांच्या नावांमध्ये बदल केला होता. यामध्ये १५ पर्वत, पाच नागरी वस्त्या, चार पर्वतीय खिंडी, दोन नद्या आणि एका सरोवराचा समावेश आहे. भारतानेही लडाखमधील १० पर्वतशिखरे, तीन पर्वत, सात भूभाग, दोन खिंडी, दोन हिमनद्या, एक खोरे, एक जलस्त्रोत आणि एक नदी अशा एकूण 28 ठिकाणांची नावे नकाशात अधिकृत केली आहेत. चीन संपूर्ण अरूणाचलवर दावा सांगत असून या भागाला तो दक्षिण तिबेट अथवा झांगनान, असे संबोधतो. लडाखच्या बाबतीतही त्याचे धोरण भारताला डिवचणारे आहे. चीन भारताच्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाला अधिकृत मान्यता देत नाही. त्याची निर्मिती झाल्यापासून चीनने ही भूमिका घेतली आहे. या संघर्षाचे स्वरूप सध्या तरी नकाशे आणि नावे यांच्यापुरतेच आहे. प्रत्यक्ष युद्धाची स्थिती निर्माण होण्यास मोठा अवधी लागत असतो. एका-एका घटनांची मालिका तयार होते, त्याबद्दलच्या भावना तप्त होतात आणि पहेलगामसारख्या घटनेमुळे स्फोट होत असतो. भारताच्या दृष्टीने लडाख आणि अरूणाचल प्रदेश हे सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे प्रदेश आहेत आणि त्यांच्याबद्दल चीन अशी आगळिक करतोय. भूतकाळात केलेल्या चूका येणाऱ्या कित्येक पिढ्यांना भोगाव्या लागतात, याची उदाहरणे जम्मू-काश्मीर, लडाख आणि तिबेटच्या रूपात आपल्यासमोर आहेत. चीन १९४८ मध्ये परकीय जोखडातून मुक्त झाला आणि त्याने लगेच लडाखवर नजर रोखली. तत्कालीन नेहरू सरकारला पत्ताही न लागू देता लडाखमध्ये घुसखोरी करीत तिबेट आणि शिनजियांग आणि तिबेटला जोडणारा जी-२१९ हा चीन राष्ट्रीय महामार्ग बांधून टाकला. त्याला शिनजियांग-तिबेट महामार्ग असेही म्हणतात. त्या काळात अशा घुसखोरीच्या मुद्यावर लोकसभेत चर्चा सुरू असताना लडाखमध्ये गवताचे पातेही उगवत नाही, असे धक्कादायक विधान पंडित नेहरू यांनी २८ ऑगस्ट १९५९ रोजी केले होते. लडाख आणि अक्साई चीनमधील निर्जन आणि उघड्याबोडख्या पर्वतांचे महत्त्व तेव्हापासून चीनला ओळखू आले होते. दुर्दैवाने आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्या नेहरूनच्या ते गावीही नव्हते. चीनने कब्जा केलेल्या लडाखमधील अक्साई चीनच्या पठारावरून जाणाऱ्या जी-२१९ महामार्गामुळे आज चीन एवढा प्रगती करू शकला. आज त्या देशाची रेल्वे थेट लंडनपर्यंत पोहोचली आहे. त्यानंतर चीनने काराकोरम महामार्ग बांधून काढला, जो व्याप्त काश्मीरमधून जातो. त्या काळात नेहरूंनी चूक केली नसती आणि अक्साई चीनसह व्याप्त काश्मीर भारताकडे असता तर आज भारताला चाबहारवर अवलंबून राहावे लागले नसते. जो गिलगिट-बाल्टिस्तानचा भूभाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे, तेथूनच भारताची रेल्वे आणि मालमोटारी माल घेऊन थेट लंडन आणि मास्कोपर्यंत पोहोचले असते. याच भागातून चीन आणि पाकिस्तानने महामार्ग बांधला आहे. हा मार्ग थेट ग्वादार बंदरापर्यंत जातो. परिणामी आज याच मार्गाने चीन-पाकिस्तान यांच्यात व्यापार सुरू आहे. १३०० किलोमीटर लांबीचा काराकोरम महामार्ग सामरिक आणि लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याला चीन-पाकिस्तान मैत्री महामार्गही म्हटले जाते. भारताची प्रगती चीन आणि पाकिस्तान यांना पाहावत नाही. चीनमध्ये लोकशाही नाही आणि पाकिस्तानात ती नावापुरती आहे. या पृष्ठभूमीवर प्रचंड वैविध्य असलेला भारत अत्यंत वेगाने प्रगती करीत असलेल्या देशांच्या रांगेत जाऊन बसलेला आहे. लडाखमधील ठिकाणांच्या संदर्भातील चीनची मळमळ भारताची प्रगती सहन होत नसल्यामुळे बाहेर आली. लडाखमधील ठिकाणे हे निमित्त. जॉर्ज फर्नांडिस यांनी केलेल्या विधानाप्रमाणे चीन पूर्वीही मित्र नव्हता आणि भविष्यातही नसेल, हे आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे आणि त्याच्यापासून सतत सावध राहिले पाहिजे.