कारंजा लाड,
municipal-council कारंजा नगर परिषदेद्वारे संचालित उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक १ आणि २ येथील दोन मुख्याध्यापकांसह बजाज पल्सर मोटारसायकलस्वाराचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. बुधवार, १४ ऑटोबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास शेलूबाजारजवळील तपोवन फाट्यावर ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे कारंजा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये कारंजा नगर परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक १ चे मुख्याध्यापक सय्यद आबिद हुसेन सय्यद रऊफ (वय ५६), उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक २ चे मुख्याध्यापक नाझिम मोहम्मद नूर मोहम्मद (वय ५७ वर्षे) आणि पिंपळगाव येथील रहिवासी विजय गोविंदा चव्हाण, बजाज पल्सर मोटारसायकलस्वार, यांचा समावेश आहे.
याबाबत सविस्तर असे की, पल्सर मोटारसायकलचा क्रमांक एमएच ३० बीव्ही ६३३१ असल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, दोन्ही मुख्याध्यापक शाळांच्या संचमान्यतेशी संबंधित कामासाठी कारंजा येथून वाशीममधील प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयाकडे मोटारसायकलने जात होते. दरम्यान, शेलूबाजारजवळील तपोवन फाट्यावर समोरून येणार्या बजाज पल्सर मोटारसायकलची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.या धडकेत तिघांचाही मृत्यू झाला. शासकीय कामासाठी प्रवास करत असताना दोन अनुभवी मुख्याध्यापकांवर काळाने घाला घातल्याने शिक्षकवर्गातून हळहळ व्यक्त होत आहे. पुढील कायदेशीर व वैद्यकीय प्रक्रियेसाठी तिघांनाही मंगरूळनाथ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती आहे. दोन्ही मुख्याध्यापक कारंजा नगर परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत दीर्घकाळ कार्यरत होते. शासकीय कामासाठी प्रवास करताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कारंजा नगर परिषदेसह संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निधनाने शिक्षकवर्गातून शोक व्यक्त केला जात आहे.