नालासोपारा
vasai imperial heights building वसई-नालासोपारा लिंक रोडवरील इम्पीरियल हाइट्स इमारतीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. फाल्गुनी शाह आणि अश्विनी पारकर अशी मृत महिलांची नावे असून, दोघींचेही वय ५० वर्षे होते. आगीतून पसरलेल्या धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याच इमारतीच्या १४व्या मजल्यावर अडकलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने क्रेनच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा-वसई लिंक रोडवरील इम्पीरियल हाइट्स इमारतीत मध्यरात्रीच्या आसपास आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. इमारतीतून आगीच्या ज्वाळा आणि मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडू लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत फाल्गुनी शाह आणि अश्विनी पारकर या दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला. तुळींज रुग्णालयाच्या प्रभारी डॉ. कविता जगदा यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, धुरामुळे श्वास गुदमरल्याने या महिलांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
आगीच्या भीषणतेमुळे इमारतीतील एका कुटुंबातील चार जण १४व्या मजल्यावर अडकले होते. जीव वाचवण्यासाठी त्यांनी इमारतीच्या बाहेरील एका लहानशा जागेचा आधार घेतला. घराबाहेर आगीच्या ज्वाळा पसरल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य होत नव्हते. त्यामुळे सुमारे ४० ते ४५ मिनिटे त्यांना मदतीच्या प्रतीक्षेत राहावे लागले. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. उंच मजल्यावर अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या क्रेनचा वापर करण्यात आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून या चारही जणांना सुखरूप बाहेर काढले.
नवरात्रोत्सव सुरू असल्याने परिसरात आधीपासूनच नागरिकांची मोठी गर्दी होती. आगीची माहिती मिळताच वसई-विरारचे माजी महापौर रुपेश जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथील परिस्थितीची पाहणी करून मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला. आचोळे पोलीसही घटनास्थळी उपस्थित होते. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे १४व्या मजल्यावर अडकलेल्या चार जणांचे प्राण वाचवण्यात यश आले.
दरम्यान, इमारतीला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. इमारतीतील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत होती की नाही, तसेच या दुर्घटनेत किती आर्थिक नुकसान झाले, याचीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. संबंधित यंत्रणांकडून तपासणी आणि चौकशी झाल्यानंतर आगीचे कारण, अग्निसुरक्षेची स्थिती आणि नुकसानीचा तपशील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.