महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या अध्यक्षपदी अंकुश आहेर

    दिनांक :15-Oct-2026
Total Views |
 
आमगाव,
ankush-ahir-cooperative-presidentमहाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या अध्यक्षपदी हिंगोली येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या महत्वपूर्ण निवडीमुळे महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात भारतीय जनता पक्षाने आपली पकड अधिक मजबूत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, संपूर्ण राज्यातुन अंकुश आहेर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 

punes 
बाजार समिती संघाच्या पुणे येथील मुख्यालयात पिठासीन अधिकारी मोहन निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष बैठक पार पडली. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले संघाचे तत्कालीन अध्यक्ष प्रवीण कुमार नाहटा यांच्या विरोधात नुकताच अविश्वास ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर अध्यक्षपदासाठी संघाचे अंकुश आहेर यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. यावेळी सुचक संतोष सोमवंशी होते तर अनुमोदन माजी आमदार तथा संचालक केशवराव मानकर यांनी केले.
 
 
या निवडीसाठी जेष्ठ संचालक माजी आमदार जयवंत जगताप आणि माजी आमदार केशवराव मानकर यांनी आग्रही भूमिका घेत बाजार समिती संघाच्या अध्यक्षपदासाठी भाजपचा अध्यक्ष बनविण्यात मोलाची कामगिरी केली. या बैठकीत माजी आमदार केशवराव मानकर, जयवंत जगताप, उपसभापती संतोष सोमवंशी, संचालक मनीष दळवी, अशोक डख, सेवकराम ताथोड, दिनेश चोखरे, बाबाराव पाटील, पंडरीनाथ थोरे, सारिका हारगुडे, रंजना कांडेलकर, अनिल गावड, दामोदर नवपुते, संजय कामनापुरे, संदीप काळे, विजय खवास, पोपटराव सोनवणे, नाना नागमोते व रमेश शिंदे यांच्यासह सर्व कार्यकारीणी संचालक उपस्थित होते.