शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत १० ते १५ हजारांची मदत मिळावी-बच्चू कडू

    दिनांक :15-Oct-2026
Total Views |

नागपूर,
bachchu-kadu-on-farmer-aidएकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील नाराजीच्या चर्चेवर बोलताना माजी मंत्री बच्चू कडू यांनी हे प्रकरण टीव्हीपुरतेच असल्याचे म्हटले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्यातील दोन मोठे नेते आहेत. त्यांच्याबाबत आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी बोलण्याचा अधिकार नाही. दोघांमधील नाराजी केवळ टीव्हीवर दिसते, असे ते म्हणाले. नागपुरात बच्चू कडू आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत विविध राजकीय आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडण्यात आली.
 
bachu
 
महाविकास आघाडीतील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना कडू म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा सुरू आहे; मात्र महायुतीमध्ये अशी स्पर्धा नाही. पुणे विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारी मागे घेण्याच्या मुद्द्यावर विदर्भातील नेते भाष्य करणार नसल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
 
 
सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीबाबत बोलताना ही रक्कम अपुरी असल्याचे कडू यांनी सांगितले. सध्या मिळणारी मदत हा पहिला टप्पा असून, दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना १० ते १५ हजार रुपयांपर्यंत अधिक मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
अहिल्यादेवी होळकर योजनेबाबत बोलताना गरीब शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी आणि पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत तसेच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. मात्र, एखाद्या पात्र शेतकऱ्याचे नाव चुकीने वगळले गेले असल्यास त्याची दखल घेऊन कारवाई केली जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमरावतीतील व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कडू यांनी तो अंतर्गत बैठकीत दुर्गामातेच्या प्रसादासंदर्भात झालेल्या चर्चेचा विषय असल्याचे सांगितले. माध्यमांनी प्रसादाबाबत वेगळे चित्र दाखविल्याचा आरोप त्यांनी केला. अंतर्गत बैठकीतील व्हिडिओ चोरून काढून प्रसिद्धीसाठी ब्रेकिंग न्यूज करणे चुकीचे आहे.असे कृत्य कायद्याने गुन्हा ठरू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
शिवसेनेच्या बैठकीबाबत बोलताना कडू यांनी प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाने काम केल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेतृत्व पक्षाकडे असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात शिवसेनेचा विस्तार करण्यावर भर दिला जात आहे. गावागावांत पक्ष पोहोचवून विदर्भातही शिवसेनेची ताकद वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
 
एकनाथ शिंदे यांचे विदर्भाकडे सातत्याने लक्ष असून, विदर्भाला विधान परिषदेचे चार आमदार मिळाले आहेत. विदर्भातील जनतेनेही शिंदे यांना प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.