अमरावती
digital-arrest-scam डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ऑनलाईन आर्थिक फसवणुकीला बळी पडलेल्या ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अमरावती शहर सायबर पोलिसांनी दिलासा दिला आहे. तांत्रिक तपास आणि बँकांशी केलेल्या तातडीच्या पाठपुराव्यामुळे फसवणूक झालेल्या ८० लाख ८० हजार रुपयांपैकी ४० लाख फिर्यादीच्या बँक खात्यात परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही रक्कम १२ ऑक्टोबर रोजी खात्यात जमा झाली.फिर्यादी किशोर हिरूसा खराटे (वय ७२, रा. शिवछाया कॉलनी, शंकरनगर, अमरावती) हे सेंट्रल बँक ऑफ इंडियामधून व्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. १२ ऑगस्ट रोजी त्यांना एका महिलेचा फोन आला. तिने आपण वरिष्ठ पोलिस अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्या पॅन कार्डचा वापर करून आयसीआयसीआय बँकेत खाते उघडण्यात आल्याचे आणि त्यांच्या नावावर एटीएसमध्ये गुन्हा दाखल असल्याचे भासवले.
त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना अटकेची भीती दाखवण्यात आली. व्हॉट्सॲपवर अटक वॉरंट, मालमत्ता जप्तीचे आदेश आणि गोपनीयतेसंबंधी कागदपत्रे पाठवून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. कुटुंबीयांना त्रास देण्याची तसेच पासपोर्ट आणि वैद्यकीय परवाना रद्द करण्याची धमकीही देण्यात आली. या भीतीचा फायदा घेत १२ ते १९ ऑगस्टदरम्यान आरोपींनी त्यांच्याकडून एकूण ८०.८० लाख रुपये ऑनलाइन हस्तांतरित करून घेतले.
या प्रकरणी सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा गुन्हा दाखल झाला. तपासादरम्यान पोलिसांनी डीबीएस बँक आणि कर्नाटक बँकेशी तातडीने संपर्क साधून ४० लाख रुपये गोठवले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ही रक्कम फिर्यादीच्या खात्यात परत जमा करण्यात आली. उर्वरित रकमेबाबत पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सतीश पाटील, सपोनि अनिकेत कासार, निखील माहुरे, उल्हास टवलारे, नरेंद्र उघडे, महेश वाघमारे, करण बोरकुटे, निलेश वानखडे, अनिकेत वानखडे, बाळू पालवे यांनी केली.