दिवाळीसाठी पाच हजारांची मदत म्हणजे शेतकर्‍यांची क्रूर थट्टा: हर्षवर्धन सपकाळ

कामठवाडा शिवारात दुष्काळी पाहणी

    दिनांक :15-Oct-2026
Total Views |
कारंजा लाड,
kamathwada-area शेतीच्या मशागतीपासून पेरणी, बियाणे, खते, कीटकनाशके आणि इतर कामांसाठी शेतकर्‍यांना मोठा खर्च करावा लागतो. मात्र, पिके हाताशी येण्याच्या वेळी पावसाने दडी मारल्याने संपूर्ण हंगामाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना दिवाळीसाठी पाच हजार रुपयांची मदत देण्याची चर्चा म्हणजे त्यांच्या दुःखाची थट्टा असल्याची तीव्र भावना यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली.
 
 
kamathwada-area
 
निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांची अक्षरशः वाताहत झाली असून, शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली असून, शेतीसाठी केलेला लाखोंचा खर्चही वसूल होण्याची शयता धूसर झाली आहे. या भीषण दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी १५ ऑटोबर रोजी कारंजा तालुयातील कामठवाडा शिवारात भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकरी शिवदास मेश्राम यांच्या गट क्रमांक ४६ मधील कपाशी पिकाची पाहणी करून शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शिवदास मेश्राम यांनी आठ एकर क्षेत्रात कपाशीची लागवड केली आहे. मात्र, प्रतिकूल हवामान आणि पावसाच्या अनियमिततेमुळे या संपूर्ण क्षेत्रातून केवळ दोन क्विंटल कपाशीचे उत्पादन मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांची व त्यांच्या कुटुंबाची आपुलकीने विचारपूस करून घाबरून जाऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा धीर दिला.
 
 
शेतकर्‍यांना एकरी एक लाख रुपयांची मदत, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आणि मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध करून देणे, अशा विविध मागण्या त्यांनी यावेळी मांडल्या. दुष्काळामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात सापडली असून, शेतकरी आणि शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी खरंच अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांची दिवाळी पाच हजारात होते का? असा सवाल उपस्थित करत जर ज्यांची दिवाळी पाच हजारात होत नाही तर मग शेतकर्‍यांची कशी होणार? असा सवाल देखील उपस्थित केला.
 
 
या दुष्काळी पाहणी दौर्‍यावेळी आ. अमित झनक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजू चौधरी, प्रदेश सरचिटणीस दिलीप सरनाईक, कारंजा तालुका अध्यक्ष विजय देशमुख, शहराध्यक्ष रजिकभाई ,अरविंद लाठीया, खरेदी-विक्री संघाचे संचालक निळकंठ गजभिये, दिलीप पवार, मैनुद्दीन सौदागर, असलम खान, प्रदीप वानखडे आदी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तालुकाध्यक्ष मनोज कानकिरड, अ‍ॅड. निलेश कानकीराड , विजय कडू यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी दिला. शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य न करणार्‍या सरकारच्या प्रतिनिधींना गावात फिरू देणार नाही, असा आक्रमक पवित्राही त्यांनी व्यक्त केला. सध्याचे सरकार खोटारडे असल्याची टीका करत, शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सरकारला भाग पाडू, असे त्यांनी ठणकावून सांगितले.