गडचिरोली,
gadchiroli-police-duty-meet-2026पुणे येथे आयोजित 21 व्या महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्यात गडचिरोली पोलिस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली. घातपातविरोधी तपासणी स्पर्धेतील ग्राउंड सर्च आणि रूमसर्च या दोन्ही प्रकारांत पथकाने कांस्य पदके पटकावली. तसेच, गडचिरोली परिक्षेत्राने या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला असून, पथकाची अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यासाठी निवड झाली आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्यावतीने 5 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस अधिकारी व कर्मचार्यांचे व्यावसायिक कौशल्य, कार्यक्षमता आणि कामाचा दर्जा उंचावणे हा मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेत गडचिरोली पोलिस दलाच्या बीडीडीएस पथकासह एकूण 26 विभागांनी सहभाग घेतला.
मेळाव्यात वैज्ञानिक पद्धतीने तपास, पोलिस छायाचित्रण, व्हिडीओग्राफी, संगणक जागरूकता, घातपातविरोधी तपासणी आणि श्वान पथक अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धकांची लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. घातपातविरोधी तपासणी स्पर्धेत गडचिरोली पोलिस दलाच्या बीडीडीएस शाखेतील पोलिस हवालदार पंकज हुलके आणि पोलिस अंमलदार धम्मदीप मेश्राम यांनी सहभाग घेतला. त्यांनी ग्राउंड सर्च आणि सुंदरनाथ रूम सर्च या दोन्ही प्रकारांत कांस्यपदके मिळवून गडचिरोली पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या यशामुळे गडचिरोली परिक्षेत्राच्या कौशल्यपूर्ण कामगिरीवर राज्यस्तरावर शिक्कामोर्तब झाले आहे. या उल्लेखनीय यशाच्या जोरावर पथकाची अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यासाठी निवड झाली आहे. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी पंकज हुलके आणि धम्मदीप मेश्राम यांचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले.