पुणे,
land-auction-scam-puneकोल्हापूर येथील जागेच्या लिलावात सहभागी करून जागा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मार्केट यार्ड परिसरात उघडकीस आला आहे. लिलावात सहभाग न घेतल्याने दिलेली रक्कम परत मागितली असता ती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तसेच, आरोपीच्या पत्नीने मोबाइलवर संदेश पाठवून धमकावल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिरोज खलील शेख, फौजिया फिरोज शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड परिसरातील शिवदर्शन कॉम्प्लेक्समधील कार्यालयात हा प्रकार घडला. आरोपी फिरोज शेख याने तक्रारदारांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कोल्हापूर येथील जागेच्या लिलावात सहभागी करून जागा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी १६ मे २०२६ रोजी तक्रारदारांकडून आरटीजीएसद्वारे एक कोटी १८ लाख रुपये घेतले.
मात्र, तक्रारदारांचा संबंधित लिलावात सहभाग झाला नाही. त्यामुळे त्यांनी आरोपींकडे दिलेली रक्कम परत मागितली. त्यावेळी आरोपींनी संगनमत करून पैसे परत करण्यास टाळाटाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, आरोपीच्या पत्नीने मोबाइलवर टेक्स्ट मेसेज पाठवून धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिस पुढील तपास करीत आहेत.
------------------------------------