मुंबई,
Maharashtra sugarcane crushing season 2026राज्यात आजपासून अधिकृतपणे ऊस गळीत हंगाम सुरूझाला. मात्र, शेतकरी आणि कारखानदार यांच्यामध्ये संघर्ष उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलनाची दिशा बदलत आता साखर कारखाने बंद करणार असल्याचा इशारा दिला. आज कृष्णा साखर कारखाना रेठरे येथे काटा बंद आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेमधून ऊसाला प्रति तर 5 हजार 500 दर मिळावा अशी मागणी केली आहे. यासाठी गेल्या दोन दिवसांपासून कोगनोळी टोल नाक्यावर अभूतपूर्व आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो शेतकऱ्यांनी टोलनाक्यावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात आंदोलन केले.

दुसरीकडे, राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत 5 हजार 500 दर बाजारामध्ये साखरेचे दर वाढत असल्याने ही मागणी योग्य असल्याचे म्हटलं आहे. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य हे देशात सर्वाधिक एफआरपी देणार राज्य असल्याचे वक्तव्य केलं आहे. एफआरपी ही त्या-त्या भौगोलिक क्षेत्रातील ऊसाला पडलेल्या उताऱ्यावर अवलंबून असते. सरकारने 2024 -25 साली मूळ उताऱ्यासाठी 340 प्रतिक्विंटल म्हणजे प्रतिटन 3400 रुपये एफआरपी दिली होती. 2025-26 मध्ये त्यामध्ये 15 रुपयांची वाढ करत 355 प्रतिक्विंटल म्हणजे एफआरपी 3550 रुपये इतकी केली.
पश्चिम महाराष्ट्रात उसाला उतारा जास्त पडतो त्यामुळे हा दर आणखी वाढला जातो. पश्चिम महाराष्ट्रात उसाचा उतारा 11 ते 12 टक्क्यांपर्यंत पडतो. मात्र यामधून साखर कारखानदार ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च वजा करून घेतात, त्यामुळे शेतकऱ्याला फारसा पैसा मिळत नाही. त्यामुळेच राजू शेट्टी यांनी यावेळी प्रतिटन 5 हजार 500 रुपये मिळाले पाहिजेत अशी भूमिका घेतली आहे.
दरम्यान, सलग 31 तास पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्यानंतर, प्रवाशांची होणारी कोंडी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपले महामार्गावरील ठिय्या आंदोलन मागे घेतलं आहे. मात्र, हा लढा संपलेला नसून तो थेट केंद्रीय मंत्र्यांच्या दारात नेण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.