आरमोरीपर्यंत धावणार मेमो रेल्वे

    दिनांक :15-Oct-2026
Total Views |
आरमोरी,
memu-train-extension-armoriतालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गोंदिया-वडसा मेमो आणि वडसा-चांदा फोर्ट मेमो या दोन रेल्वे गाड्यांचा विस्तार आरमोरी रेल्वे स्थानकापर्यंत करण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे आरमोरीसह परिसरातील नागरिकांना रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 

aarmori
 
रेल्वे बोर्डाने 10 ऑक्टोबर 2026 रोजी जारी केलेल्या मंजुरी पत्रानुसार, गाडी क्रमांक 68806 गोंदिया-वडसा मेमो आणि गाडी क्रमांक 68808 वडसा-चांदा फोर्ट मेमो या रेल्वे गाड्यांचा विस्तार आरमोरी स्थानकापर्यंत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाचे संयुक्त संचालक (कोचिंग) विवेक कुमार सिन्हा यांनी जारी केलेल्या पत्रात दोन्ही गाड्यांच्या विस्तारित वेळापत्रकाला मंजुरी देण्यात आल्याचे नमूद आहे.
 
उपलब्ध माहितीनुसार, गोंदिया येथून रात्री 7.10 वाजता सुटणारी मेमो रेल्वे वडसा स्थानकावर रात्री 9.30 वाजता पोहोचेल. त्यानंतर रात्री 9.35 वाजता वडसा येथून पुढील प्रवासासाठी रवाना होऊन रात्री 10 वाजता आरमोरी रेल्वे स्थानकावर पोहोचण्याचे नियोजन आहे. या रेल्वेसेवेच्या विस्तारामुळे आरमोरी आणि परिसरातील नागरिकांना गोंदिया तसेच अन्य ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे प्रवासाचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांना याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच परिसरातील दळणवळणाला चालना मिळण्यास मदत होऊ शकते.
 
आरमोरी तालुका आणि परिसरातील नागरिकांना रेल्वे प्रवासाची सुविधा मिळावी, अशी अपेक्षा अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात होती. या पृष्ठभूमीवर दोन्ही मेमो रेल्वे गाड्यांचा आरमोरीपर्यंत विस्तार करण्याच्या निर्णयाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. रेल्वेसेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचण्यास मदत होण्याची शक्यता आहे. याशिवाय आरमोरी परिसरातील व्यापार, शिक्षण आणि दैनंदिन प्रवासालाही चालना मिळू शकते.
 
आरमोरी रेल्वे स्थानकापर्यंत या गाड्यांचा विस्तार प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना रेल्वे प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे विस्तारित रेल्वेसेवा प्रत्यक्ष कधी सुरू होणार तसेच दोन्ही गाड्यांचे संपूर्ण सुधारित वेळापत्रक काय असेल, याकडे आरमोरीवासीयांचे लक्ष लागले आहे.