बुलडाणा
msedcl जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना विनाखंड वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरण प्रशासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बंद अथवा नादुरुस्त पडलेल्या रोहित्रांची (ट्रान्सफॉर्मर) माहिती आता नागरिक थेट व्हॉट्सअॅप पाठविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नवीन सुविधेमुळे ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती तसेच ते बदलण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होणार असून ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा देण्यास मदत होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे यांनी दिली.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या सूचनेनुसार मोबाईल अॅपवर ही सेवा आधीपासूनच उपलब्ध करण्यात आली आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेत असलेल्या या अॅपमध्ये ग्राहक आपल्या ग्राहक क्रमांकाद्वारे किंवा ’गेस्ट’ म्हणून प्रवेश करून ’नादुरुस्त रोहित्राची माहिती नोंदवा’ या पर्यायावर फोटो अपलोड करून एका लिकवर तक्रार नोंदवू शकतात.
याशिवाय, अधिक सोप्या आणि जलद संपर्कासाठी बुलडाणा जिल्ह्यात विशेष व्हॉट्सअॅप सेवा सुरू केली आहे. यासाठी ७८७५४४६७५४ या स्वतंत्र व्हॉट्सअॅप क्रमांक जारी करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी नादुरुस्त रोहित्राचा स्पष्ट फोटो काढून तो संबंधित क्रमांकावर पाठवावा. महावितरणच्या पथकाला अचूक ठिकाण शोधता यावे, यासाठी फोटोसोबत रोहित्राचे नाव, परिसराचे नाव आणि सविस्तर पत्ता देणे आवश्यक आहे. व्हॉट्सअॅपवर मेसेज प्राप्त होताच ती माहिती तातडीने संबंधित विभागाकडे वर्ग करून दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.
सध्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना मोठा दिलासा देण्यासाठी महावितरणने प्रत्येक जिल्ह्याला १ हजार रोहित्र उपलब्ध करून दिले आहेत. जिल्हा कार्यालयांकडून दररोज रोहित्रांची स्थिती व वीज पुरवठ्याचा आढावा घेतला जात आहे. संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून बळीराजाला तसेच सर्व ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.