अमरावतीत म्युल बँक अकाऊंट रॅकेटचा पर्दाफाश

सहा आरोपींना अटक, ५५ लाखांचे व्यवहार उघड

    दिनांक :15-Oct-2026
Total Views |
अमरावती
mule-bank-account-racke सायबर फसवणुकीतून मिळणारी रक्कम स्वीकारण्यासाठी म्युल बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या स्थानिक टोळीचा अमरावती शहर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, यापूर्वी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या दहा झाली आहे.
 
mule scam
सायबर पोलिस स्टेशन, अमरावती शहर यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. सायबर फसवणुकीतून मिळणारी रक्कम म्युल बँक खात्यांमध्ये जमा करून ती विविध बँक खात्यांमध्ये तसेच इतर माध्यमांतून हस्तांतरित केली जात असल्याचे उघड झाले. ही खाती सायबर फसवणूक, ऑनलाईन गेमिंग आणि क्रिप्टोकरन्सी व्यवहारांसाठी वापरली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. संबंधित खात्यांवर ५५ लाखांहून अधिक आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
 
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रथमेश केशवराव वानखेडे, अमित गोपालसिंग चंदेल (ठाकूर), सत्यम विजय साबु, सुजित सुनील माळोदे, अंश प्रमोद यादव आणि आकाश वासुदेवराव काळे यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी अमरावती शहरातील रहिवासी आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून सायबर गुन्ह्यांसाठी वापरण्यात आलेले सात मोबाईल जप्त केले. तसेच या प्रकरणाशी संबंधित २०० हून अधिक बँक खात्यांवर आणि त्यातील रकमांवर इतर राज्यांतील पोलिसांनी होल्ड लावला आहे. या खातेधारकांवर आणि वापरकर्त्यांवरही कारवाई करण्यात येणार असून, रॅकेटमधील इतर स्थानिक व परराज्यांतील आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिस निरीक्षक सतीश पाटील यांच्या नेतृत्वात सपोनि अनिकेत कासार, अंमलदार जितेंद्र थोरात, निखिल माहुरे, उल्हास टवलारे, अपर्णा बंडे, विशाल यादव, महेश वाघमारे, अश्विन यादव, निखिल हिमाने, रोशन लकडे, पवन जाधव, अनिकेत वानखडे, चेतन गुल्हाने, सपना साखरे, सुषमा आठवले, अविनाश पोकळे या सायबर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.