नागपूर,
nagpur-breaking-news लग्नासाठी तगादा लावल्याच्या रागातून प्रेयसीची हत्या करून तिचा मृत्यू विजेचा धक्का लागल्याने झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूरच्या एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत जळगाव येथून ३५ वर्षीय आरोपी जावेद शेख शहीद मन्नियार याला अटक केली. कविता (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणातील संशय अधिक गडद झाला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
पोलिसांच्या माहितीनुसार, कविता आणि जावेद यांची ओळख महाविद्यालयीन काळात झाली होती. गेल्या सुमारे १५ वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. दरम्यान, दोघांनी वेगवेगळ्या व्यक्तींशी विवाह केला, तरीही त्यांचा संपर्क कायम होता. जावेद हा नागपूरमध्ये एअर कंडिशनर दुरुस्तीचे काम करत होता, तर कविता एका मेसमध्ये काम करत होती. कवितेला जावेदशी लग्न करायचे होते; मात्र जावेद विवाहित असल्याने आणि तिच्यापासून दूर जात असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे.
घटनेच्या दिवशी कविताचा पती कामानिमित्त गावी गेला होता, तर तिच्या दोन्ही मुली त्यांच्या काकाच्या घरी होत्या. याच काळात जावेद तिच्या घरी आला. सायंकाळी लग्नाच्या विषयावरून दोघांमध्ये वाद झाल्याचा आरोप आहे. या वादातून जावेदने कविताच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीने घटनास्थळी विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासातून समोर आले.
मृत्यूचे खरे कारण लपवण्यासाठी आरोपीने कविताच्या मृतदेहाजवळ इमर्शन हीटर ठेवला होता. तसेच, मृतदेहाला हीटरच्या माध्यमातून विजेचा धक्का बसल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला ही घटना विजेच्या धक्क्यामुळे घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना मृत महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळल्या. त्यामुळे मृत्यू अपघाती नसून त्यामागे घातपात असण्याची शक्यता निर्माण झाली.
सोमवारी सकाळी कविताच्या मुली घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मृत महिलेच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स तपासण्यात आले असता, ती जावेदच्या नियमित संपर्कात असल्याचे निदर्शनास आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जावेदचा माग काढला. तो जळगाव जिल्ह्यात असल्याचे समजल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला मंगळवारी अटक करण्यात आली आणि पुढील चौकशीसाठी नागपूरला आणण्यात आले.
चौकशीदरम्यान दोघांच्या दीर्घकाळ चाललेल्या संबंधांची आणि लग्नावरून निर्माण झालेल्या वादाची माहिती समोर आली. त्यांच्या नात्याला सुरुवातीपासूनच विरोध होता, तरी विवाहानंतरही दोघांचा संपर्क कायम राहिला होता. अलीकडच्या काळात जावेद कविताकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्यातील मतभेद वाढल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील सर्व बाबींचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, उल्हासनगरमध्येही बुधवारी रात्री हिंसक घटना घडली. रेल्वे स्थानकाजवळ हरीश गजवानी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्रथम कोयत्याने हल्ला केला आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यात दोन गोळ्या झाडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या हल्ल्यामागील कारणांचा तपास सुरू आहे.