अश्लील व्हिडीओच्या आधारे इन्फ्लुएन्सर तरुणी ब्लॅकमेल

    दिनांक :15-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
nagpur influencer चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून एका १९ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला जाळ्यात ओढत तिचे अश्लील व्हिडीओ तयार करण्यात आले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत आरोपींनी तिच्याकडून तीन लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेकडे दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी तहसील पोलिसांनी १३ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
 

nagpur influencer 
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, तरुणी गेल्या काही वर्षांपासून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि शैक्षणिक संकेतस्थळांवर सक्रिय होती. याच काळात तिची इरफान नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. त्याने तिला ‘मिका’ नावाचे ॲप वापरण्यास प्रवृत्त केले. आरोपीने आपण श्रीमंत व्यावसायिक असून उत्तर प्रदेशातील एका राजकीय संघटनेचा नेता असल्याचे भासविल्याचा आरोप आहे. चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने तरुणीकडून वैयक्तिक कागदपत्रे ऑनलाइन मिळविली. त्यानंतर व्हिडीओ कॉलदरम्यान आरोपीने अश्लील संभाषण सुरू केले. तरुणीला आभासी लैंगिक कृती करण्यास भाग पाडून त्याचे स्क्रीन रेकॉर्डिंग केल्याचा आरोप आहे. तिच्या संमतीशिवाय अश्लील व्हिडीओ तयार करून तेच पुढे ब्लॅकमेलिंगसाठी वापरण्यात आले. हे व्हिडीओ इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी देत आरोपींनी पीडितेकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. बदनामीच्या भीतीने तरुणीने तीन लाख रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी तिच्या वैयक्तिक कागदपत्रांचाही गैरवापर केल्याचा आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकारामुळे तरुणी मानसिक तणावाखाली आली. या प्रकरणात राजस्थानमधील रतनगड येथील इरफान अली (३५), उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील वीरेंद्र राणा (४०), नितीन जैन (२७), चंडीगडमधील शाही मजरा येथील किरण मित्तल आणि गोव्यातील पणजी येथील पायल ऊर्फ डेस्टिनी (३४) यांच्यासह अन्य संशयितांची नावे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहेत. तहसील पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची नेमकी भूमिका, कथित आर्थिक व्यवहार आणि पीडितेच्या कागदपत्रांचा गैरवापर याबाबत पुढील तपास सुरू आहे.