प्रणव सातोकर
नागपूर,
nagpur-navratra-celebrationsऐतिहासिक वारसा लाभलेल्या नागपूरच्या सदर परिसरात भोसलेकालीन इतिहासाच्या खुणा आजही पाहायला मिळतात. याच परिसरातील प्रसिद्ध शीतला माता मंदिर श्रद्धा, परंपरा आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. १९३८ मध्ये स्थापन झालेल्या या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. यंदाच्या नवरात्रोत्सवात मंदिरात ४०१ मनोकामना ज्योती प्रज्वलित करण्यात आल्या आहेत.
शीतला माता मंदिरातील देवीची पुरातन मूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची विशेष गर्दी होते. मनोकामना पूर्ण होण्यासाठी भाविक येथे श्रद्धेने प्रार्थना करतात. मंदिरातील धार्मिक परंपरा अनेक वर्षांपासून जपल्या जात आहेत.
अडीचशे वर्षांचा पिंपळ आजही श्रद्धेचे केंद्र
या मंदिराच्या परिसरात असलेले पिंपळाचे झाड हे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अंदाजे अडीचशे ते तीनशे वर्षे जुने असलेले हे झाड आजही दिमाखात उभे आहे. काळाच्या ओघात अनेक बदल झाले, मात्र या पुरातन वृक्षाचे महत्त्व कायम आहे. भाविक या पिंपळाच्या झाडाची श्रद्धेने पूजा करतात. त्यामुळे मंदिरातील धार्मिक परंपरेसोबतच निसर्गाशी जोडलेली श्रद्धाही येथे अनुभवायला मिळते.
ऐतिहासिक सदर परिसरातील हे मंदिर नागपूरच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाची साक्ष देत आहे. पुरातन देवीची मूर्ती, नवरात्रोत्सवातील मनोकामना ज्योती आणि शेकडो वर्षांचा पिंपळ यांमुळे या मंदिराला वेगळी ओळख प्राप्त झाली आहे.
मंदिराशी संबंधित माहिती राजेश कानोजिया यांनी दिली.