अमेरिकेत हिंदू मंदिरात नरसंहाराचा कट

गोळीबार करताना ट्रिगर जाम झाल्यानं अनर्थ टळला, १९ वर्षीय तरुणाला अटक

    दिनांक :15-Oct-2026
Total Views |
शिकागो
massacre hindu temple us मंदिरात गोळीबार करायच्या तयारीत असताना रायफलचा ट्रिगर जाम झाल्यानं आणि सहकाऱ्यानं पोलिसांना कळवल्यानं पुढील अनर्थ टळला असं पोलीस तपासात समोर आलंय.
 
hindu mandir
अमेरिकेतील एका राज्यात हिंदू मंदिरात गोळीबारात सामूहिक हत्याकांडाचा कट उधळून लावण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी १९ वर्षेय तरुणाला अटक केलीय. मंदिरावर हल्ला करण्याची त्यानं तयारी केली होती. पण मंदिरात गोळीबार करायच्या तयारीत असताना रायफलचा ट्रिगर जाम झाल्यानं आणि सहकाऱ्यानं पोलिसांना कळवल्यानं पुढील अनर्थ टळला असं पोलीस तपासात समोर आलंय. अलेक्झांड्रोस पापोराकिस असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे.
पापोराकिस हा शिकागोजवळील पॅलाटाइन परिसरात राहतो. तो टॅको बेल या फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये काम करत होता. त्याने सहकाऱ्यांना काही मेसेजेस आणि हल्ल्याच्या कटाची कागदपत्र पाठवल्याची माहिती आहे. त्यात शस्त्रांसोबत काढलेले फोटोही आहेत. भारतीयांविषयी द्वेष आणि वंशवादी विचार त्यानं व्यक्त केले होते असंही सहकाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने रविवारी हल्ल्याची योजना आखली होती. त्याने साथीदाराला फोन करून रायफल अडकली असल्यानं तिथून घाईने निघून गेल्याचं सांगितल्याचा आरोप आहे. त्यानंतर या कटाची माहिती सहकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं.
घरातून रायफल आणि काडतुसे जप्त
आरोपीच्या घरी पोलिसांनी छापा टाकला असता रायफल, भरलेली मॅगझिन, मोठ्या प्रमाणात काडतुसे, बॉडी आर्मर आणि इतर साहित्य आढळून आलं. त्याच्याकडून आठ पानांचं एक कथित घोषणापत्रही मिळालं आहे. त्यात भारतीय, ज्यू आणि आफ्रिकन-अमेरिकन नागरिकांविषयी द्वेषपूर्ण विचार आणि हिंसक हल्ले करण्यासंबंधी मजकूर असल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणा या कागदपत्रांची पडताळणी करत आहेत.
आरोपीवर दहशतवादी धमकी देणे आणि बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. न्यायालयाने खटला सुरू होईपर्यंत त्याला कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी ३० ऑक्टोबरला होणार आहे.