गुंतवणूकदारांचा पैसा कुठे वळला?
नवी दिल्ली,
stock-market अमेरिका आणि दक्षिण कोरियासह अनेक जागतिक शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण होत असताना भारतीय बाजारात सेन्सेक्स-निफ्टीने जोरदार उसळी घेतली. जगभरातील शेअर बाजारांमध्ये सध्या उलथापालट सुरू आहे. अमेरिकेपासून आशियापर्यंत अनेक बाजारांमध्ये विक्रीचा दबाव दिसत असताना मात्र भारतीय शेअर बाजारायने गुरुवारी जोरदार उसळी घेतली. एका बाजूला शेअर बाजारात मोठी घसरण होऊन लाखों कोटी रुपयांचे नुकसान झाले, तर दुसरीकडे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जवळपास 1% वाढ होताना दिसली.
आशियाई बाजारात द. कोरियाला मोठा फटका
गुरुवारी आशियाई बाजारांमध्ये विक्रीचा होर वाढलेला दिसला. दक्षिण दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे 7.7% घसरला, तर तैवानच्या बाजारातही मोठी पडझड झाली. विशेषतः सेमीकंडक्टर आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून आला. दक्षिण कोरियातील सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात 7% पेक्षा जास्त घसरले, तर SK Hynix च्या शेअर्समध्ये 8% पेक्षा अधिक घसरण नोंदवण्यात आली. या घसरणीमुळे दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराचं बाजारमूल्य सुमारे 203 अब्ज डॉलर म्हणजेच 18.3 लाख कोटी रुपयांनी कमी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
अमेरिकेतील बाजार कोसळला
बुधवारी अमेरिकी शेअर बाजार सलग तिसऱ्या सत्रात घसरून बंद झाले. S&P 500 निर्देशांक 1.1%, Nasdaq Composite 1.9%, तर Dow Jones 0.1% घसरला. अमेरिकेत सध्या महागाई वाढली असून महागाईचा दबाव कायम राहिल्यास फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवू शकते, अशी चिंता गुंतवणूकदारांना आहे. व्याजदर वाढल्यास कंपन्यांसाठी कर्ज महाग होऊ शकतं आणि विशेषतः AI क्षेत्रातील डेटा सेंटर व तंत्रज्ञान प्रकल्पांचा खर्च वाढू शकतो. त्यामुळे पुढे या चिंतेचा परिणाम AI आणि सेमीकंडक्टर कंपन्यांच्या शेअर्सवर झाला. त्यानंतर गुरुवारी आशियाई बाजारांमध्येही विक्रीचा दबाव दिसला. मात्र, याच काळात भारतीय
बाजारात मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजी नोंदवली.
AIवर प्रश्नचिन्ह
गेल्या काही काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, AI तंत्रज्ञानासाठी कंपन्या करत असलेला प्रचंड खर्च आणि त्यातून मिळणारा प्रत्यक्ष आर्थिक परतावा याबाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. AI क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स अपेक्षेपेक्षा जास्त महाग झाले आहेत का, तसेच या गुंतवणुकीतून अपेक्षित नफा मिळेल का, याचा गुंतवणूकदार पुन्हा विचार करत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर कंपन्यांमध्ये नफावसुली वाढल्याचं चित्र आहे.
भारतीय शेअर बाजार हिरवागार?
अमेरिकेपासून दक्षिण कोरियापर्यंत सगळे बाजार लाल रंगात असताना भारतीय शेअर बाजार मात्र हिरव्या रंगात व्यवहार करत आहे. विशेष म्हणजे आजच्या व्यवहारदम्यान सेन्सेक्सने जवळपास 1,000 अंकांची वाढ नोंदविली तर निफ्टी 50 मध्येही जवळपास 300 अंकांची वाढ झाली. मात्र, या तेजीचा फायदा सर्वच शेअर्सना झाला असं नाही. मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी होत असताना मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये सुमारे 0.5% घसरण दिसून आली. यावरून बाजारातील तेजी प्रामुख्याने निवडक मोठ्या कंपन्यांमध्ये केंद्रित असल्याचं दिसतं. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी वाढत असले, तरी संपूर्ण बाजारात खरेदीचा जोर आहे असे म्हणता येत नाही.
तिमाही निकालांचा आधार
भारतीय बाजारातील तेजीमागे कंपन्यांच्या तिमाही निकालांचाही हातभार असल्याचं मानलं जात आहे. TCS आणि HCLTech यांसारख्या मोठ्या IT कंपन्यांचे निकाल बाजाराच्या अपेक्षांपेक्षा चांगले राहिल्यास तंत्रज्ञान क्षेत्राबाबतचा गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन सुधारू शकतो. तसेच निफ्टी IT निर्देशांक सलग तीन सत्रांमध्ये 9% पेक्षा जास्त वाढला आहे. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमती, अमेरिकी बाँड यिल्डमधील वाढ आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी खरेदी-विक्री हे घटकही भारतीय बाजारासाठी महत्त्वाचे राहतील.