सणासुदीच्या काळात सायबर गुन्हेगार सक्रिय
नागपूर,
vishwas-nangare-patil दसरा-दिवाळीचा सण जवळ आला की बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग वाढते. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, गृहपयोगी साहित्यापासून भेटवस्तूंपर्यंत सर्वच वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहक ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘एक खरेदी करा, एक मोफत मिळवा’, ‘७० टक्क्यांपर्यंत सूट’, ‘दिवाळी बंपर धमाका’, ‘मर्यादित वेळेची ऑफर’ अशा जाहिरातींचा भडिमार सुरू होतो. मात्र, या आकर्षक ऑफर्सच्या आड सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचे जाळे विणलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऑफरच्या मोहात पडण्यापूर्वी ती खरी आहे की फसवणुकीचा ‘स्कॅम’, याची खातरजमा करणे आवश्यक आहे.

सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदी वाढत असल्याने सायबर गुन्हेगारही विविध क्लृप्त्या वापरून ग्राहकांना लक्ष्य करतात. नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट जाहिराती तयार करणे, आकर्षक सवलतींचे संदेश पाठवणे, सोशल मीडियावर बनावट शॉपिंग वेबसाइटच्या लिंक प्रसारित करणे, तसेच व्हॉट्सॲपवर बंपर ऑफरचे आमिष दाखवणे, अशा माध्यमांतून ग्राहकांना जाळ्यात ओढले जाते. कमी किमतीत महागडी वस्तू मिळण्याच्या आशेने ग्राहक संबंधित लिंकवर क्लिक करतात आणि फसवणुकीची सुरुवात होते. काही बनावट वेबसाइटवर खरेदीची ऑर्डर नोंदवताना ग्राहकांकडून नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, बँक खात्याशी संबंधित माहिती आणि कार्डचे तपशील भरून घेतले जातात. काही प्रकरणांत पेमेंट करण्याच्या नावाखाली बनावट पेमेंट पेजवर नेले जाते. तर काही वेळा ऑर्डरची पुष्टी किंवा डिलिव्हरीच्या नावाखाली ग्राहकांना लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास भाग पाडले जाते. अशा प्रकारे मिळवलेल्या माहितीचा गैरवापर करून बँक खात्यातील रक्कम लंपास केली जाऊ शकते. त्यामुळे केवळ आकर्षक जाहिरात किंवा कमी किमतीवर विश्वास ठेवून ऑनलाइन खरेदी करणे धोकादायक ठरू शकते.
बनावट लिंक, ओटीपी पासून सावध राहा
सायबर गुन्हेगार केवळ खरेदीच्या जाहिरातींचाच वापर करतात असे नाही. कॅशबॅक मिळवून देणे, रिफंड देणे, बक्षीस लागल्याचे सांगणे किंवा डिलिव्हरीमध्ये अडचण आल्याचे कारण देऊनही ग्राहकांशी संपर्क साधला जाऊ शकतो. या प्रक्रियेत ओटीपी, यूपीआय पिन किंवा कार्डचा गोपनीय तपशील मागितला जाऊ शकतो. काही वेळा मोबाईलवर स्क्रीन शेअरिंग किंवा रिमोट ॲक्सेस ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. बँक किंवा अधिकृत संस्था असल्याचे सांगून कोणी गोपनीय माहिती मागत असेल, तरी तिची स्वतंत्रपणे खातरजमा करावी.
स्वत:ही सावधगिरी बाळगा
सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदी करताना नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर आलेल्या प्रत्येक ऑफरवर विश्वास न ठेवता संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवर जाऊन माहिती तपासावी. वेबसाइटचा पत्ता नीट पाहावा, विक्रेत्याची विश्वासार्हता तपासावी आणि शक्यतो अधिकृत पेमेंट माध्यमांचाच वापर करावा. सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा. तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टल वर तक्रार नोंदवावी. दसरा-दिवाळीचा आनंद साजरा करताना ऑनलाइन खरेदीच्या मोहात सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू नका. नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. स्वस्तात मिळणाऱ्या वस्तूच्या आमिषापेक्षा आपल्या पैशांची सुरक्षितता महत्त्वाची आहे.