२०५७ पर्यंतच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन लटकले

    दिनांक :15-Oct-2026
Total Views |
वर्धा, 
wardha-water-project-pendingवर्धा शहरासह परिसरातील गावांमध्ये वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केलेल्या नवीन जलपुरवठा योजना सध्या अधांतरी आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आलेला हा प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्याचे पुढे आले. आगामी ३० वर्षांतील पाण्याची गरज लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या मंजुरीबाबत अद्याप स्पष्टता नाही.
 
 
pani
 
या योजनेत वर्धा शहरासह पिपरी (मेघे) आणि अन्य १४ गावांचा समावेश करण्यात आला होता. योजनेचा प्रस्तावित खर्च २०९ कोटी ६५ लाख ८७ हजार रुपये असून २०५ किमी लांबीची नवीन जलवाहिनी टाकण्याचे नियोजन करण्यात आले होते. तसेच जुन्या प्रादेशिक जलपुरवठा योजनेतील विविध कामांची दुरुस्तीही केली जाणार होती. शहरातील वाढते नागरीकरण आणि साडेचार लाख लोकसंख्येच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्याची गरज लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली होती. सन २०५७ पर्यंतची पाण्याची गरज पूर्ण करून भविष्यातील संभाव्य जलसंकट टाळण्यासाठी नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. भविष्यात वर्धा शहराच्या हद्दीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन योजनेच्या प्रस्तावात काही सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
 
 
 
त्यानुसार आवश्यक बदलही करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा आता योजनेच्या मंजुरीत अडथळा ठरत असल्याची माहिती आहे. शहरालगतच्या काही ग्रामपंचायतींनी हद्दवाढीला विरोध केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे योजनेच्या अंतिम मंजुरीचा प्रश्न कायम असून, ती कधी मार्गी लागणार, याबाबत अनिश्चितता आहे. परिणामी, वर्धा शहर आणि परिसरातील गावांच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
योजनेतील प्रस्तावित कामं
नव्या पाणी पुरवठा योजनेंतर्गत अनेक महत्त्वाची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यात प्रामुख्याने येळाकेळी येथील हेडवर्क्स, जुन्या हेडवर्क्सची दुरुस्ती आणि नवीन हेडवर्क्सची उभारणी, हनुमान टेकडी येथील जलशुद्धीकरण केंद्र भागातील जुन्या केंद्राची दुरुस्ती आणि २९ एमएलडी क्षमतेच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती, १४ गावांमध्ये स्वतंत्र क्षमतेचे प्रत्येकी एक जलकुंभ, जुन्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती तसेच आवश्यक तांत्रिक आणि पूरक कामांचा समावेश आहे.