वाशीम,
washim-voter-revision-driveवाशीम जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षण, विशेष मतदार नोंदणी मोहीम आणि मतदार जनजागृती उपक्रमांना चांगली गती मिळाली आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील यंत्रणांनी केलेले काम कौतुकास्पद असून, पात्र मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न समाधानकारक आहेत, असे प्रतिपादन अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अपर आयुक्त संजय जाधव, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,रवी काळे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी विरेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्ह्यातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.
प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण ८ लाख ८५ हजार २६९ मतदारांची नोंद आहे. यामध्ये ४ लाख ६१ हजार ८९२ पुरुष, ४ लाख २३ हजार ३६० महिला आणि १७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. गतदोन महिन्यांत राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी शिबिरांना नागरिकांसह युवा वर्गाचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध टप्प्यांवर आयोजित विशेष शिबिरे तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमांमधून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक पात्र तरुणाची मतदार म्हणून नोंदणी व्हावी, यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यासाठी जिल्हा प्रशासनाने ११ मुद्यांची विशेष कार्ययोजना अमलात आणली आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत वाशीम जिल्ह्यातील यंत्रणांनी केलेल्या कामाचे कौतुक करून विभागीय आयुक्त गुंडे यांनी मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना गती कायम ठेवण्याचे आवाहन केले. सर्व मतदान नोंदणी अधिकारी, सर्व सहायक मतदान नोंदणी अधिकारीही उपस्थित होते.