अनिल कांबळे
नागपूर,
accused arrested विधवा महिलेचा वारंवार छळ करून तिच्या १३ वर्षीय मुलीला अश्लील चाळे केल्याच्या आरोपावरून तहसील पोलिसांनी ४५ वर्षीय योगेश गंगनलाल गौर याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३६ वर्षीय महिला घरकाम करून उदरनिर्वाह करते. आरोपी तिच्याच परिसरात राहत असून, यापूर्वीही तो वारंवार त्रास देत असल्याचा आरोप आहे. शेजारी राहत असल्याने महिलेने त्याच्या वर्तनाकडे दुर्लक्ष केले होते. १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता महिलेची मुलगी घराबाहेर सायकल चालवत होती. त्यावेळी आरोपीने तिला अडवून अश्लील चाळे केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर रात्री महिला घराबाहेर पाणी येण्याची वाट पाहत असताना आरोपीने तिच्या अंगावरील पांघरूण ओढले. तसेच दारू पिण्यासाठी सोबत येण्यास सांगून तिच्या गालाला स्पर्श केल्याचा आरोप आहे. महिलेने विरोध करताच आरोपी तेथून निघून गेला. महिलेच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.