तिरंगा मार्चचा प्रयत्न हाणून पाडला

अभिजित दीपके-नेहा बोराला पोलिसांनी घेतले ताब्यात

    दिनांक :16-Oct-2026
Total Views |

 

तभा वृत्तसेवा

नवी दिल्ली

abhijit-dipke राजधानी दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरातील सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवा आंदोलनात सहभागी होण्याच्या आधीच दिल्ली पोलिसांनी सावधगिरीचा उपाय म्हणून कॉक्रोच पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांना ताब्यात घेतले. या परिसरात तिरंगा मार्च काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.
 

dipake

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अभिजित दीपके यांनी शुक्रवारी कॅनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवा आंदोलनाचे आवाहन केले होते. कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाचा आधीचा अनुभव लक्षात घेऊन पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारत परिसरात भारतीय न्याय संहितेचे १६३ कलम लागू केले. कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाच्या पृष्ठभूमीवर एनडीएमसीने सेंट्रल पार्क परिसर प्रशासकीय कारणावरून १६ आणि १७ ऑक्टोबर असा दोन दिवसांसाठी बंद केला होता.

 

या आंदोलनासाठी दीपके एकटेच हातात तिरंगा घेत कॅनॉट प्लेस परिसराच्या दिशेने निघाले. सायंकाळी पाच वाजता या ठिकाणाहून मार्च निघणार होता. आप आणि अन्य संघटनांनी या तिरंगा मार्चला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मोठ्या संख्येत तरुण-तरुणी परिसरात दाखल झाले होते.

 
सेंट्रल पार्कमध्ये पोहोचण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांचे एक पथक दीपके यांच्यापर्यंत पोहोचले आणि प्रतिबंधात्मक आदेशामुळे या परिसरात मार्चला अनुमती नसल्याचे त्यांना सांगितले. मी काय केले, मी एकटा जात आहे, असे दीपके म्हणत होते. पण, मार्च काढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे पोलिसांनी दीपके यांना पोलिस ताब्यात घेतले. यावेळी समर्थकांनी घोषणाबाजी केली. मंडी हाऊस परिसरात आंदोलन करणाऱ्या ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या (आयसा) अध्यक्ष नेहा बोरा यांना पालिसांनी ताब्यात घेतले. घोषणाबाजी करत सेंट्रल पार्कच्या दिशेने जाण्याचा नेहा बोरा आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला होता.
 

कॅनॉट प्लेसला पोलिस छावणीचे स्वरूप

कॉक्रोच पार्टीच्या तिरंगा मार्चच्या आवाहनामुळे कॅनॉट प्लेस आणि त्यातील सेंट्रल पार्क परिसरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवान या भागात तैनात करण्यात आले होते. सेंट्रल पार्कमध्येही मोठ्या संख्येत सुरक्षा दलाचे जवान दिसत होते. विशेष म्हणजे कॅनॉट प्लेसच्या आऊटर सर्कलमधील वाहतूक पोलिसांनी रोखली नाही, ती सुरु ठेवण्यात आली.
 

दीपकेंचा मुक्काम अनिश गावंडेंकडे

शुक्रवारी सकाळी दिल्ली पोलिसांचे एक पथक दीपके यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आणि आंदोलन न करण्याबाबतची नोटीस बजावली. प्रतिबंधात्मक आदेश डावलून आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा या नोटिशीतून देण्यात आला होता. दिल्लीत अभिजित दीपके यांचा मुक्काम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते अनिश गावंडे यांच्या निवासस्थानी आहे.
 

व्यापाऱ्यांची निदर्शने

कॅनॉट प्लेस परिसरातील पालिका बाजारमधील व्यापाऱ्यांनी कॉक्रोच पार्टीच्या तिरंगा यात्रेच्या विरोधात निदर्शने केली. हे व्यापारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या समथनार्थ घोषणाबाजी करत होते. ‘मोदी-मोदी’च्या घोषणाही यावेळी ऐकू येत होत्या. व्यापाऱ्यांनी दिल्ली पोलिसांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनामुळे अनेक दिवसापासून कॅनॉट प्लेस परिसर बंद आहे. त्यामुळे आमचा व्यवसाय ठप्प झाला, आर्थिक नुकसान होतस्सल्याचा आरोप व्यापाऱ्यांचा आहे. या मुद्यावरून व्यापाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही पाठवले आहे.