आदिशक्ती आत्मसंरक्षण शस्त्र प्रशिक्षण शिबिर

सशक्त युवती, सुरक्षित समाजाची पायाभरणी

    दिनांक :16-Oct-2026
Total Views |
नागपूर,
aadishakti-self-defense-camp-nagpurआदिशक्ती आत्मसंरक्षण शस्त्र प्रशिक्षण शिबिरआदिशक्ती आत्मसंरक्षण शस्त्र प्रशिक्षण शिबिरनवरात्रोत्सवानिमित्त चरैवेति फाउंडेशनतर्फे आयोजित "आदिशक्ती आत्मसंरक्षण शस्त्र प्रशिक्षण शिबिरा"ची सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा आणि चरैवेति फाउंडेशनच्या अध्यक्षा शिवानी दाणी वखरे यांनी परिषदेत उपक्रमाचा उद्देश, आतापर्यंतची वाटचाल आणि पुढील कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थित पत्रकारांसमोर मांडली. यावेळी नगरसेवक जितेंद्रसिंग ठाकुर, योगेश पाचपौर, सुरेंद्र पांडे, किशोर धर्मे, प्रशांत आकांत आणि समर्थ रागीट हे मान्यवर उपस्थित होते.
शिवानी दाणी वखरे यांनी सांगितले की, फाउंडेशनने गेल्या वर्षीही असेच शिबिर आयोजित केले होते, ज्यात १०० हून अधिक मुलींनी सहभाग घेतला होता. त्या प्रतिसादातून प्रेरणा घेऊन यंदा उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यात आली आणि नागपुरातील ५० हून अधिक ठिकाणी, म्हणजेच विविध क्लासेस, शाळा (९ वी व १० वीच्या विद्यार्थिनी), महाविद्यालये आणि महिला मंडळांमध्ये दोन दिवसीय शिबिरे घेण्यात आली. या प्रशिक्षणात लाठी-काठी कला, आत्मसंरक्षणाची तंत्रे, आत्मविश्वास व नेतृत्वगुण विकास, शारीरिक तंदुरुस्ती तसेच संघभावना यांवर भर देण्यात आला. महाविद्यालयीन युवतींना शारीरिकदृष्ट्या सक्षम, आत्मनिर्भर आणि सुरक्षित बनवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
 
 
 
                                                                  
self
 
 
 
 उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, "नवरात्रात श्रृंगार, गरबा आणि दांडिया यांचे आयोजन सर्वत्र होत असते, ते आनंददायीच आहे. परंतु नवरात्र हा शक्तीच्या उपासनेचाही उत्सव आहे. आजच्या काळात प्रत्येक मुलगी स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम असली पाहिजे. हाच विचार घेऊन आम्ही हा उपक्रम राबवत आहोत."
शिबिरात प्रशिक्षण घेतलेल्या युवतींच्या प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.०० ते ९.०० वाजता. लंडन स्ट्रीट, वर्धा रोडजवळ, रॅडिसन स्क्वेअर आणि जय प्रकाश नगर, सोमलवाडा, नागपूर येथे होणार आहे. पत्रकार परिषदेत उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करून युवतींच्या सुरक्षा व आत्मनिर्भरतेसाठी असे उपक्रम समाजात सातत्याने राबवले जावेत, अशी भावना व्यक्त केली. नागपूरमधील मातृशक्ती आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवतींचा उत्साह वाढवावा आणि सुरक्षित समाजनिर्मितीच्या या प्रयत्नांना बळ द्यावे, असे आवाहन चरैवेति फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.