'आई भाड्याने हवी!' नव्याकोऱ्या सिनेमाचं भन्नाट नाव समोर

    दिनांक :16-Oct-2026
Total Views |
मुंबई,
aai-bhadyane-havi-announcementतीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीत यशाचा नवा मापदंड प्रस्थापित करत सर्व वयोगटांतील प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर जिओ स्टुडिओज् आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा एकदा एका नव्या मराठी चित्रपटानिमित्त एकत्र आले आहेत. 'आई भाड्याने हवी?' असे या आगामी चित्रपटाचे नाव असून, चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे.
 

aai
 
नवरात्रीच्या मंगलमय पर्वात स्त्रीशक्तीचा जागर होत असताना, मातृत्वाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ होणे विशेष औचित्यपूर्ण आहे. या चित्रपटात सुकन्या कुलकर्णी, विशाखा सुभेदार, पायल जाधव आणि प्रार्थना बेहरे या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. या कलाकारांच्या एकत्रित उपस्थितीमुळे चित्रपटाला अधिक रंगत येणार आहे.
 
केदार शिंदे दिग्दर्शित आणि ज्योती देशपांडे आणि सना शिंदे निर्मित 'आई भाड्याने हवी?' हा विनोदी, भावनिक आणि नातेसंबंधांची गुंफण असलेला सामाजिक मनोरंजनपट असणार आहे. आपल्या संस्कृतीशी नातं जपणारी आणि सर्व पिढ्यांतील प्रेक्षकांना भावणारी कथा सादर करण्याचा या चित्रपटाचा प्रयत्न आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि सनफ्लॉवर स्टुडिओजच्या सहयोगाने साकारला जाणारा हा चित्रपट, दैनंदिन आयुष्यातील नात्यांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहे.
 
'बाईपण भारी देवा'च्या यशस्वी सहकार्यानंतर जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे यांची ही नवी कलाकृती मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एक नवा मापदंड निर्माण करण्यासाठी सज्ज होत आहे. आशयपूर्ण कथानक, आपल्या संस्कृतीशी नातं जोडणाऱ्या आणि व्यापक प्रेक्षकवर्गाला भावणाऱ्या कथा सादर करण्याच्या जिओ स्टुडिओजच्या प्रवासातील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.