अनिल फेकरीकर
नागपूरworld-anesthesia-day विमान उडवणे आणि पुन्हा धावपट्टीवर उतरविणे अत्यंत जिकरीचे काम मानले जाते. विमान उडविण्याला ‘टेक ऑफ’ तर उतरविण्याच्या प्रक्रियेला ‘लँडिंग’ म्हटले जाते. तद्वतच रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी बेशुद्ध करण्यासाठी अशा पद्धतीच्या तंत्रावर आधारित भूल प्रक्रियेचा वापर केला जातो. भूल देण्याची प्रक्रिया ‘टेक ऑफ’ प्रमाणे असते. तर त्या रुग्णाला पुन्हा पूर्ववत शुद्धीवर आणण्याची प्रक्रिया पूर्णत: विमानाच्या ‘लँडिंग’प्रमाणेच क्लिष्ट असते. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून भूलतज्ज्ञ सहजतेने रुग्णांना सुखरूप बाहेर आणतात. याच भूलतंत्राचा शोध सुमारे १८० वर्षांपूर्वी म्हणजे १६ ऑक्टोबर १८४६ रोजी डॉ. विल्यम टी.जी.मॉर्टन यांनी लावला होता. त्यांनी भूल देण्याचा पहिला प्रयोग यशस्वी करून दाखविला अन् आधुनिक शस्त्रक्रिया क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडून आले.
तसे पाहता भूल देणे म्हणजे रुग्णाला झोपवणे नसते. सुरक्षित शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. शस्त्रक्रिया करायची झाल्यास रुग्ण प्रथमत: सर्जन कोण असा प्रश्न विचारतात. मात्र रुग्ण ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश करताच त्याच्या सुरक्षेची जबाबदारी भूलतज्ज्ञांवरही तेवढीच असते. दरम्यान, नागपुरातील भूलतज्ज्ञ डॉ. शीतल दलाल, डॉ. सौरभ बरडे, डॉ. लीना इंगळे गेडाम यांनी भूलविषयी अनाठायी भीती न बाळगण्याचे आवाहन केले आहे.
एकंदरीत पाहता भूल दिल्याशिवाय वेदनारहित शस्त्रक्रिया आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही. हे शाश्वत सत्य मानले तर आधुनिक भूलतंत्र रुग्णांसाठी नक्कीच तारक ठरले, असे म्हणणे अतिशयोक्तीपूर्ण ठरू नये.
भूलतज्ज्ञ कोण हेही विचारा
पूर्वी केवळ शस्त्रक्रिया करणारा सर्जन कोण असाच प्रश्न विचारला जायचा. आता काळ बदलला आहे. भूलतज्ज्ञ कोण यावरही रुग्णांचा भर असतो. अर्थात आधुनिक भूलशास्त्र हे अत्यंत प्रगत, शास्त्रशुद्ध वैद्यकीय क्षेत्र आहे. यातूनच रुग्ण बरे होण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. तेव्हा शस्त्रक्रिया करताना बेशुद्ध करून शुद्धीवर आणणारा नेमका देवदूत कोण याचीही विचारणा रुग्णालयाला करायलाच हवी, याकडेही भारतीय भूलतज्ज्ञ संघटना नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. दीपक मदनकर यांनी लक्ष वेधले आहे.
भूल ५ मिनिटांपासून ते २४ तासांपर्यंतही देता येते. गरजेनुसार जनरल अॅनेस्थेशिया, स्पायनल अॅनेस्थेशिया, टार्गेट, नर्व्ह ब्लॉक करून भूल दिली जाते. शरीराच्या कुठल्याही अवयवांवर प्रतिकूल परिणाम होऊ न देता रुग्णाला बेशुद्ध करण्याची हातोटी संबंधित डॉक्टरकडे असते. शिवाय बेशुद्ध करण्यापूर्वी रुग्ण उपाशीपोटी राहणे गरजेचे असते. अन्यथा भूलकरिता दिलेल्या औषधामुळे उलटी होण्याची भीती असते, अशीही रोचक माहिती सुप्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. सचिन माकडे यांनी दिली.